मोहीम संपल्यावर मतदार नोंदणी अर्जांचा पुरवठा
By Admin | Updated: July 2, 2014 01:03 IST2014-07-02T00:57:14+5:302014-07-02T01:03:32+5:30
औरंगाबाद : मतदार नोंदणी मोहिमेदरम्यान ठिकठिकाणी नोंदणी अर्जांचा तुटवडा जाणवत होता.

मोहीम संपल्यावर मतदार नोंदणी अर्जांचा पुरवठा
औरंगाबाद : मतदार नोंदणी मोहिमेदरम्यान ठिकठिकाणी नोंदणी अर्जांचा तुटवडा जाणवत होता. मात्र, तेव्हा तहसील कार्यालयाकडे अर्ज उपलब्ध नव्हते. नोंदणी मोहीम संपल्यानंतर आता जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेने तहसील कार्यालयाला नोंदणीचे अर्ज उपलब्ध करून दिले आहेत.
मोहिमेदरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे (बीएलओ) दुरुस्ती आणि स्थलांतराचे अर्जच नव्हते. तर नोंदणीचे अर्जही मोजकेच होते. त्यामुळे असंख्य नागरिकांना नोंदणी मोहिमेदरम्यान मतदान केंद्रांवरून परत जावे लागले. तर काही ठिकाणी नागरिकांनी अर्जांच्या झेरॉक्स विकत घेऊन अर्ज भरले. ३० जून रोजी मोहीम संपल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेने आज तहसील कार्यालयाला मतदार नोंदणीच्या अर्जांचा पुरवठा केला. याविषयी उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत हदगल यांना विचारले असता त्यांनी उपलब्ध अर्जांचे आधीही तहसील कार्यालयाला वितरण करण्यात आले होते. आता आणखी अर्ज उपलब्ध झाले असतील म्हणून त्याचा पुरवठा करण्यात आला असे सांगितले.
अहवालाचा प्रवास कासवगतीने
जिल्ह्यात २८ आणि २९ जून रोजी मतदान केंद्रांवर नोंदणी मोहीम राबविण्यात आली. त्यासाठी सर्व केंद्रांवर केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची (बीएलओ) नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, काही ठिकाणी बीएलओ पोहोचलेच नाहीत. अशा बीएलओंवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले होते. त्यानुसार सर्व तालुक्यांकडून अहवाल मागविण्यात आला होता. मात्र, अद्यापही हे अहवाल प्राप्त झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.