व्हॉलीबॉल खेळाडूंचा ‘भाईचारा’
By Admin | Updated: November 14, 2015 00:51 IST2015-11-14T00:17:36+5:302015-11-14T00:51:28+5:30
महेश पाळणे , लातूर क्रीडा क्षेत्र हे असे एकमेव क्षेत्र आहे की, यात जाती-पातींच्या गोष्टींना थारा नसतो. खांद्याला खांदा लावत विजयासाठी खेळाडू धडपडत असतात

व्हॉलीबॉल खेळाडूंचा ‘भाईचारा’
महेश पाळणे , लातूर
क्रीडा क्षेत्र हे असे एकमेव क्षेत्र आहे की, यात जाती-पातींच्या गोष्टींना थारा नसतो. खांद्याला खांदा लावत विजयासाठी खेळाडू धडपडत असतात. सांघिक खेळात तर एकजूटता महत्त्वाची आहे. यावरच सांघिक खेळाचा विजयरथ आगेकूच करीत असतो. दिवाळी उत्सवातही खेळाडूंचा हा एकोपा मैदानावर दिसून आला. दिवाळी पाडव्यानिमित्त क्रीडा संकुलात हिंदू-मुस्लिम खेळाडूंनी मैदानाची पूजा करून एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने हा सण साजरा करून ‘खिलाडूवृत्ती’ दाखवून दिली.
गुरुवारी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दिवाळीच्या पाडव्याला शहरातील महाराष्ट्र क्लब व न्यू फ्रेण्डस् क्लब या दोघा संघातील खेळाडूंनी मैदानावरच दिवाळी साजरी केली. एरवी स्पर्धेत खेळताना हे दोन संघ एकमेकांसमोर आल्यावर विजयासाठी धडपडत असतात. मात्र मैदानाबाहेर यांचे ऋणानुबंध कायम असते. मात्र पाडव्या दिवशी या दोन्ही संघांनी एकत्र येऊन दिवाळी साजरी केली.
गुरुवारी सायंकाळच्या वेळी ज्येष्ठ खेळाडू शेषेराव साकोळे यांच्या हस्ते व्हॉलीबॉल मैदानाची पूजा करून फटाके फोडण्यात आले. जाती-पातींच्या भिंती तोडून खेळाडूंनी एकमेकांना मिठाई भरविली. हा आनंद खेळाडूंसाठी अविस्मरणीय होता. ही एकजूटतेची शिदोरी भविष्यात त्यांना यशोशिखर गाठण्यास नक्कीच मदत करेल.
नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेले खेळाडूही दिवाळीसाठी गावी आल्याने तेही मैदानावर यावेळी उपस्थित होते. यासह दोन्ही क्लबचे आजी-माजी खेळाडूही सहभागी होते. यात आझम पठाण, दत्ता सोमवंशी, व्यंकुराम गायकवाड, कृष्णा पोतदार, ललित जोशी, दिनेश खानापुरे, रियाज शेख, सिद्धार्थ भालेराव, विठ्ठल कवरे, समीर सय्यद, आफताब शेख, समीर शेख, ऐतेशाम शेख, सलीम शेख, साजिद सय्यद, प्रल्हाद सोमवंशी, शोएब शेख यासह महिला खेळाडूंचीही हजेरी होती. एकंदरित, या सणात खेळाडूंनी संघ भावनेने मैदानावर दिवाळी साजरी केल्याने त्यांच्या खिलाडूवृत्तीसह राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडले.