विठ्ठल नामाची शाळा भरलीऽऽ
By Admin | Updated: July 10, 2014 01:02 IST2014-07-10T00:49:43+5:302014-07-10T01:02:18+5:30
लातूर : हाती तुळशीची माळ, कपाळावर उभा गंध अन् बुक्का आणि मुखातून होणारा विठुरायाचा जयघोष यामुळे बुधवारी शहरातील विठ्ठल मंदिर परिसर भक्तिमय झाला होता़

विठ्ठल नामाची शाळा भरलीऽऽ
लातूर : हाती तुळशीची माळ, कपाळावर उभा गंध अन् बुक्का आणि मुखातून होणारा विठुरायाचा जयघोष यामुळे बुधवारी शहरातील विठ्ठल मंदिर परिसर भक्तिमय झाला होता़ रिमझिम पावसातही भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या़ शिवाय, शहरातील विविध शाळा, नर्सरींतील विद्यार्थ्यांनी संत-महात्म्यांची वेशभूषा परिधान करून देखाव्यांसह मुख्य रस्त्यांवरून पालखीसह चित्तवेधक मिरवणुका काढल्या होत्या. दरम्यान, प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंगरशेळकी येथील श्री समर्थ धोंडू तात्यांच्या समाधीचे, वांजरवाड्यातील संत गोविंद माऊलींचे तसेच देवणीतील विठ्ठल- रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली होती़
पंढरपूरच्या विठ्ठल हा गरिबांचा देव आहे, अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची धारणा असल्याने आषाढी एकादशीला विठ्ठल- रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची पंढरपूरला धाव असते़ काही भाविक आपल्या शहरातील, परिसरातील विठ्ठल- रुक्मिणीचे दर्शन घेऊन समाधान मानतात़ बुधवारी सकाळपासूनच शहरातील गंजगोलाई परिसरातील विठ्ठल- रुक्मिणी परिसरात आबालवृध्दांनी दर्शनासाठी रांग लावली होती़ विठ्ठल- विठ्ठल जय हरी असा जयघोष करीत भाविकांनी विठ्ठल- रुक्मिणीची मनोभावे दिवसभर पूजा करुन दर्शन घेत होते़ मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत असल्याने वातावरणही भक्तिमय झाले होते़ गेल्या महिनाभरापासून वरुणराजाने हुलकावणी दिल्याने चिंताग्रस्त झालेल्या बळीराजाला दोन दिवसांपासून बरसात करुन वरुणराजाने दिलासा दिला आहे़ त्यामुळे भाविकांत आनंद ओसंडून वाहत होता़
शहरात दिवसभर पावसाच्या सरी सुरु होत्या़ अशा पावसातही भाविकांनी दर्शनासाठी, धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी गर्दी केली होती़ मंदिर परिसरात पूजेच्या साहित्याची दुकाने थाटली होती़ बुधवारी शाळेस सुट्टी असल्याने बालकांसह ज्येष्ठ मंडळी मंदिरातील धार्मिक कार्यक्रमांत तल्लीन झाल्याचे दिसून येत होते़
संत गोविंद माऊलींच्या दर्शनासाठी गर्दी
वांजरवाडा : जळकोट तालुक्यातील वांजरवाडा येथील श्री संत गोविंद माऊली, विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनासाठी बुधवारी भाविकांनी गर्दी केली होती़ दर्शनासाठी पहाटेपासूनच रांग लागली होती़ वडगाव, सोरगा, दापका, जांब बु़, धामणगाव, केकतसिंदगी, उमरदरा, उमरगा रेतू या गावांतील दिंड्या वांजरवाडा येथे बुधवारी दाखल झाल्या होत्या़ गावकऱ्यांच्या वतीने पहाटे महापूजा करण्यात आली़ त्यानंतर भाविकांना पूजा करुन दर्शन घेत होते़
नेत्रसुखद पालखी सोहळा
देवणी : बुधवारी देवणीतील विठ्ठल- रुक्मिणी मंदिर व परिसर भाविकांनी फुलून गेला होता़ देवनदीवरील या मंदिराच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या़ प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मंदिरापासून नगर प्रदक्षिणा व पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला़ खांद्यावर भगवी पताका, हातात टाळ- मृदंग घेऊन भाविक या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते़ दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले़
हत्तीबेट, लोणी माळरानावर रीघ
उदगीर : आषाढी एकादशीनिमित्त तालुक्यातील ठिकठिकाणच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तसेच हत्तीबेट व लोणी येथील माळरानावरील विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी रीघ लावली होती़ शहरातील दुधिया हनुमान मंदिर, विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
शाळांचीही दिंडी़़़
आषाढी एकादशीनिमित्त शहरातील विविध शाळांच्या वतीने दिंडी काढण्यात आली़ छोट्या बालकांनी कपाळी उभा गंध, त्यामध्ये बुक्का, दोन्ही कान व गालास पांढरा गंध लावून दिंडीत सहभाग घेतला होता़ काही चिमुकल्यांच्या हाती टाळ, चिपळ्या तर काहींच्या हाती वीणा तर काहींच्या हाती मृदंग होते़ टाळ, मृदंग, चिपळ्या आणि वीणेच्या गजरात वारकऱ्यांची वेशभूषा परिधान केलेली बालके विठ्ठल विठ्ठल जय हरी असा जयघोष करीत होते़ सकाळपासूनच विद्यार्थ्यांची ही लगबग सुरु असल्याचे पहावयास मिळाले़