मतविभागणीच ठरली पराभवास कारणीभूत
By Admin | Updated: November 16, 2014 00:36 IST2014-11-16T00:23:01+5:302014-11-16T00:36:27+5:30
जालना : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी न झाल्याने मतविभागणीचाच फटका राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना बसला.

मतविभागणीच ठरली पराभवास कारणीभूत
जालना : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी न झाल्याने मतविभागणीचाच फटका राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना बसला. त्यामुळे भोकरदनची जागा गमवावी लागली तर बदनापूरला शर्थीचे प्रयत्न करूनही पराभव स्वीकारावा लागला, असा सूर शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन बैठकीतून उमटला.
येथील राष्ट्रवादी भवनमध्ये माजी खासदार अॅड. अंकुशराव टोपे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, आ. राजेश टोपे, माजी आमदार चंद्रकांत दानवे, बबलू चौधरी, राजेश राऊत, एकबाल पाशा, उपनगराध्यक्ष शाह आलमखान, बाळासाहेब तनपुरे, गोविंदभाऊ राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती. अंकुशराव टोपे म्हणाले की, घनसावंगी मतदारसंघात विविध विकास कामे मोठ्या प्रमाणावर झाल्याने विरोधी पक्षांनी फारसा जोर लावण्याचा प्रयत्न केल्यानंतरही त्यांना मतदारांनी नाकारले व राजेशभैय्या यांना निवडून दिले. भोकरदन व बदनापूरमध्ये पक्षाच्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर मते मिळविली.
आ. टोेपे म्हणाले की, मतविभागणीचा फटका बसल्यामुळेच जिल्ह्यात तीन मतदारसंघांमध्ये पक्षाच्या उमेदवारांचा पराभव झाला. परंतु आता पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने काम करण्याची गरज आहे. जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, माजी आ. चंद्रकांत दानवे, बबलू चौधरी, एकबाल पाशा आदींनी आपली मनोगते व्यक्त केली. या बैठकीस जयमंगल जाधव, जिजाबाई जाधव, गणेश आर्दड, जयाजी देशमुख, विश्वंभर भुतेकर, मनोज मरकड, अॅड. संजय काळबांडे, संजय दाड, रमेशचंद्र तवरावाला आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)