विठ्ठलनामाचा आज पंढरपुरात गजर

By Admin | Updated: July 9, 2014 00:51 IST2014-07-09T00:22:17+5:302014-07-09T00:51:49+5:30

वाळूज महानगर : छोट्या पंढरपुरात उद्या ९ जुलै रोजी आषाढी एकादशी यात्रेनिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले

Vithalnnama today's flood in Pandharpur | विठ्ठलनामाचा आज पंढरपुरात गजर

विठ्ठलनामाचा आज पंढरपुरात गजर

वाळूज महानगर : छोट्या पंढरपुरात उद्या ९ जुलै रोजी आषाढी एकादशी यात्रेनिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, दर्शनासाठी हजारो भाविकांचा जनसागर उसळणार आहे.
दरवर्षी छोट्या पंढरपुरात आषाढी एकादशी यात्रेनिमित्त यात्रा भरत असते. यात्रेनिमित्त मंदिर परिसराची रंगरंगोटी करून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. येथील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात उद्या ९ जुलै रोजी मध्यरात्री १२ वाजून १ मिनिटाने औरंगाबाद पंचायत समितीचे उपसभापती सर्जेराव पा. चव्हाण व त्यांच्या पत्नी रंजना पा. चव्हाण यांच्या हस्ते महाभिषेक होणार आहे. महाअभिषेक व पूजा झाल्यानंतर मनपा स्थायी समितीचे सभापती विजय वाकचौरे हे सपत्नीक आरती करणार आहेत. महाअभिषेक, पूजा व आरती कार्यक्रमानंतर रात्री १ वाजता सर्व भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुले केले जाणार आहे. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी विश्वस्त मंडळ तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. महिला व पुरुष भाविकांना सुलभपणे दर्शनाचा लाभ घेता यावा, यासाठी स्वतंत्र लोखंडी व लाकडी बॅरिकेडस् टाकण्यात आले आहेत. पायी येणाऱ्या दिंड्यांतील वारकऱ्यांच्या दर्शनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून, त्यांना लगेच दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर परिसरात भव्य ४० बाय ७० चौरस फुटांचा शामियाना उभारण्यात आला असून, फराळ व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून, सायंकाळी ४ ते ५ या वेळेत दिंडी प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे.
सायंकाळी ५ ते ६ हरिपाठाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री ९ ते ११ यावेळी ह.भ.प. विष्णू महाराज देशमुख यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार असून, त्यानंतर रात्रभर विविध भजनी मंडळांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
दुसऱ्या दिवशी १० जुलै रोजी सकाळी ७ वाजता काँग्रेसचे पश्चिम तालुकाध्यक्ष बबनराव पेरे पाटील यांच्या वतीने भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष रत्नाकर पा. शिंदे, पुजारी ह.भ.प. पांडुरंग महाराज कुलकर्णी, ह.भ.प. श्रीराम महाराज कुलकर्णी, ह.भ.प. तान्हाजी महाराज शेरकर, ह.भ.प. भिकाजी खोतकर आदींसह वळदगाव व पंढरपूर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
पोलीस प्रशासनातर्फे कडक बंदोबस्त
आषाढी यात्रेनिमित्त छोट्या पंढरपुरात लाखो भाविकांची गर्दी उसळत असल्यामुळे पोलीस प्रशासनातर्फे कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
यात्रा परिसरात भाविकांच्या सुरक्षितेसाठी १ सहायक पोलीस आयुक्त, ८ पोलीस निरीक्षक, ३० पोलीस उपनिरीक्षक, ६ महिला पोलीस उपनिरीक्षक, २९० पोलीस कर्मचारी व ५५ महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. याशिवाय विश्वस्त मंडळाच्या वतीने ठिकठिकाणी स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत. मेडिएटर्स अँड अजंठा सिक्युरिटी एजन्सीच्या वतीने ५० सुरक्षारक्षक नेमण्यात आल्याचे अविनाश सदाफळ व पी.जी. मुळे यांनी सांगितले.
विठ्ठल भक्तांसाठी फराळाची व्यवस्था
आषाढी यात्रेनिमित्त छोट्या पंढरपुरात दर्शनासाठी येणारे वारकरी व भाविकांसाठी विविध सेवाभावी संस्था, उद्योजक, व्यापारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आदींच्या वतीने चहा, पाणी, फराळ आदीची व्यवस्था करण्यात आली आहे.
यात्रेवर १४ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
यात्रेनिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी १४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यातील ४ कॅमेरे मंदिरात, तर १० कॅमेरे मंदिराच्या परिसरात बसविण्यात आले आहेत. गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊ नये तसेच गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या होऊ नयेत याकरिता संशयितरीत्या फिरणाऱ्या व्यक्तीवर या कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.
फिरत्या स्वच्छतागृहाची व्यवस्था
आषाढी यात्रेनिमित्त दर्शनासाठी येणारे भाविक व दिंड्यांतील वारकऱ्यांसाठी महानगरपालिकेच्या वतीने वळदगाव रोडवर फिरत्या स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. या परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्यामुळे यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची कायम कुंबचणा होत होती. मनपाने फिरत्या स्वच्छतागृहाची व्यवस्था केल्यामुळे भाविकांची गैरसोय टळणार आहे.

Web Title: Vithalnnama today's flood in Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.