विटेकर यांची निवड निश्चित

By Admin | Updated: September 20, 2014 23:40 IST2014-09-20T23:34:19+5:302014-09-20T23:40:13+5:30

परभणी : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राजेश विटेकर यांची निवड निश्चित मानली जात आहे़

Vitekar's choice is fixed | विटेकर यांची निवड निश्चित

विटेकर यांची निवड निश्चित

परभणी : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची औपचारिकता बाकी राहिली असून, शिवसेनेच्या सदस्यांना तटस्थ राहण्याचा व्हीप बजावण्यात आल्याने अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेश विटेकर यांची निवड निश्चित मानली जात आहे़
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांत गट पडले आहेत़ अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने पक्षाच्या वतीने सोनपेठ तालुक्यातील जि़प़ सदस्य राजेश विटेकर यांना उमेदवारी दिली आहे़ विटेकर यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादी काँग्रेसमधील दुसऱ्या गटाने विरोध दर्शविला होता़ अध्यक्षपदासाठी माजीमंत्री सुरेश वरपूडकर यांचे चिरंजीव तथा मावळते जि़प़ उपाध्यक्ष समशेर वरपूडकर यांचे नाव राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटाकडून पुढे करण्यात आले होते़ यावरून दोन्ही पक्षातील सदस्य फुटले़ काँग्रेसच्या एका गटाने वरपूडकर यांना तर दुसऱ्या गटाने विटेकर यांना साथ दिल्याने निवडणुकीतील चुरस वाढली होती़ त्यामुळे विटेकर यांच्या गटाकडे राष्ट्रवादीचे १८ तर वरपूडकर यांच्याकडे ७ सदस्य होते़ विटेकर यांच्या गटात काँग्रेसचे तीन सदस्य गेले शिवाय अन्य काही पक्षाचे सदस्य मिळून त्यांच्याकडे २६ सदस्य संख्या झाली होती़ पुन्हा हा एकदा आकडा ३१ वर पोहचला असल्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आ़ बाबाजानी दुर्राणी यांनी सांगितले.त्यामुळे विटेकर यांचीच निवड होणार असल्याचेही आ़ दुर्राणी म्हणाले़
या निवडणुकीत शिवसेनेला अध्यक्षपद देण्याचा काँग्रेसच्या दुसऱ्या गटाने घाट घातला होता़ परंतु, जिल्ह्यातील राजकारणाचा विचार करता सदस्य संख्या कमी असल्याने यामध्ये यश मिळणार नाही, हे जाणून शिवसेनेने सावध भूमिका घेतली़ पक्षाच्या ११ सदस्यांना निवडणुकीत तटस्थ राहण्याचा व्हीप बजावण्यात आला आहे, तशी पुष्टीही शिवसेनेच्या गोटातून देण्यात आली़ त्यामुळे विटेकर यांचा अध्यक्षपदाचा मार्ग आता मोकळा झाला आहे़ शिवसेनेचे ११ सदस्य तटस्थ राहिल्यास विटेकर यांना अध्यक्षपद मिळविण्यासाठी २२ सदस्यांचा आकडा गाठावा लागणार आहे़ प्रत्यक्षात त्यांच्याकडे यापेक्षा अधिक सदस्य आहेत़ त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीची औपचारिकता आता बाकी राहिली असल्याचे सुत्रांनी सांगितले़ जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपदही राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहणार आहे़ त्यामुळे या निवडणुकीत पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे व आ़ बाबाजानी दुर्राणी यांचाच वरचष्मा राहणार आहे़ (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Vitekar's choice is fixed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.