राज्य बालहक्क आयोगाच्या अध्यक्षांची पोदार शाळेला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 00:24 IST2017-08-12T00:24:51+5:302017-08-12T00:24:51+5:30
कसून चौकशी करावी आणि सदर गोष्टीचा खुलासा करावा, असे आदेश राज्य बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी शुक्रवारी पोदार सीबीएसई स्कूलच्या शालेय प्रशासनाला दिले.

राज्य बालहक्क आयोगाच्या अध्यक्षांची पोदार शाळेला भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शाळेत घडलेला प्रकार निश्चितच अशोभनीय आहे. विद्यार्थिनींच्या आणि पालकांच्या म्हणण्यानुसार विद्यार्थिनींनी शालेय प्रशासनाकडे याविषयी वारंवार तक्रार केली होती. विद्यार्थिनींनी तक्रार करूनही संबंधित प्रशासनाने यावर कारवाई करण्यात हलगर्जीपणा का केला, या दिरंगाईबाबत कसून चौकशी करावी आणि सदर गोष्टीचा खुलासा करावा, असे आदेश राज्य बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी शुक्रवारी पोदार सीबीएसई स्कूलच्या शालेय प्रशासनाला
दिले.
पोदार सीबीएसई स्कूलमधील विद्यार्थिनींनी मागील दोन वर्षांपासून लगट करणारा शिक्षक विलास काकडे याच्याविरुद्ध गुरुवारी तक्रार केली आणि शालेयस्तरावर विद्यार्थिनींच्या बाबतीत होणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या पार्श्वभूमीवर घुगे यांनी शाळेला भेट दिली. प्राचार्य अभिजित दिवे आणि इतर शिक्षकांशी झालेल्या प्रकाराबाबत चर्चा
केली.
यावेळी महिला बालविकास विभागातील अधिकारी तृप्ती ढेरे, बालसंरक्षण अधिकारी परमानंद उके, परिविक्षा अधिकारी आर. के. चंदेल, गटशिक्षण अधिकारी रमेश ठाकूर आदींची उपस्थिती होती.
शिक्षकाकडून मागील दोन वर्षांपासून होणाºया छळाबाबत वारंवार शालेय प्रशासनाकडे तक्रार केली असल्याचे सदर विद्यार्थिनींनी सांगितले. मात्र, शाळेतील शिक्षकांनी या गोष्टीला स्पष्ट नकार दिला. त्यांच्या मते सदर विद्यार्थिनींकडून अशी कोणतीही तक्रार कधीच आलेली नव्हती. विद्यार्थिनींनी एकदा जरी याबाबत स्पष्ट सांगितले असते, तरी सदर शिक्षकावर त्याचक्षणी कारवाई करण्यात आली असती, असे शालेय प्रशासनाने घुगे यांना सांगितले. शाळेतील एकंदरीत वातावरण कसे आहे, हे पाहण्यासाठी घुगे यांनी शाळेच्या एका वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि साध्या सरळ संवादातून त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला.