व्हिजन २०२१ आरोग्य आणि वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:02 IST2021-01-01T04:02:11+5:302021-01-01T04:02:11+5:30
घाटी रुग्णालयात केंद्र आणि राज्य सरकारच्या साह्याने उभारण्यात येणाऱ्या स्वतंत्र सुपर स्पेशालिटी ब्लॉकच्या इमारतीत नव्या वर्षात रुग्णसेवा सुरु होण्याची ...

व्हिजन २०२१ आरोग्य आणि वाहतूक
घाटी रुग्णालयात केंद्र आणि राज्य सरकारच्या साह्याने उभारण्यात येणाऱ्या स्वतंत्र सुपर स्पेशालिटी ब्लॉकच्या इमारतीत नव्या वर्षात रुग्णसेवा सुरु होण्याची आशा आहे. या ५ मजली इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. अनेक यंत्रसामग्रीही कार्यान्वित झाली आहे. पहिल्या टप्प्यातील पद निर्मितीलाही मंजुरी मिळाली आहे. ही पदभरती होऊन ही इमारत कार्यान्वित होणे अपेक्षित आहे. येथे हृदयरोग, मेंदूविकार, मूत्रपिंड विकार यांसह विविध सुपर स्पेशालिटीचे सर्व उपचार उपलब्ध केले जाणार आहेत.
महिला रुग्णालयाची उभारणी
गेल्या ७ वर्षांपासून केवळ कागदावर असलेल्या २०० खाटांचे महिला व नवजात शिशू रुग्णालयाच्या उभारणीला नव्या वर्षात सुरुवात होण्याची शक्यता आहे. या रुग्णालयासाठी दूध डेअरीची जागा मिळालेली आहे. तसेच १११ कोटी ८९ लाखांच्या निधीला मंजुरीही आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन २०२१ मध्ये या रुग्णालयाच्या उभारणीचा नारळ फुटून किमान २० टक्के काम होण्याची आशा आहे.
बसपोर्ट, मध्यवर्ती बसस्थानकाच्या कामाला प्रारंभ
पर्यटन राजधानी असलेल्या सिडको बसस्थानकाच्या जागी उभारण्यात येणाऱ्या बसपोर्ट आणि मध्यवर्ती बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे २८ ऑगस्ट २०१९ रोजी भूमिपूजन झाले. परंतु अद्यापही हे काम सुरू झालेले नाही. मध्यवर्ती बसस्थानकाच्या नवीन इमारतीसाठी बांधकाम शुल्क माफ करावे, अशी मागणी एसटी महामंडळाने महापालिकेकडे केली आहे. परंतु मनपाने त्यासंदर्भात निर्णय न घेतल्याने बसस्थानक उभारणीच्या कामाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. परंतु ही सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन २०२१ मध्ये किमान २० ते ३० टक्के काम होऊ शकेल.
करोडीतील ‘ग्रीन बिल्डिंग’ जाईल पूर्णत्वाकडे
शहरापासून काही अंतरावर असलेल्या साजापूर करोडी येथे आरटीओ कार्यालयाच्या जागेवर मुख्य इमारत बांधण्यात येत आहे. ही चार मजली इमारत, ‘ग्रीन बिल्डिंग’ संकल्पनेनुसार बांधण्यात येत आहे. मार्च २०२१ पर्यंत ही इमारत उभी करण्याचे लक्ष्य आहे. पण या चार मजली इमारतीच्या कामालाही कोरोनाचा फटका बसला आहे. सध्या ५० टक्के काम झाले आहे. २०२१च्या वर्षअखेरपर्यंत ८० टक्क्यांवर काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.