विष्णूपुरीत ४ दलघमी पाणी
By Admin | Updated: July 22, 2014 00:19 IST2014-07-21T23:48:04+5:302014-07-22T00:19:18+5:30
नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पाची दिवसेंदिवस खालावत चाललेली पाणीपातळी व पावसाने दिलेले ओढ त्यामुळे शहरातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे़

विष्णूपुरीत ४ दलघमी पाणी
नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पाची दिवसेंदिवस खालावत चाललेली पाणीपातळी व पावसाने दिलेले ओढ त्यामुळे शहरातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे़ विष्णूपुरी प्रकल्पात केवळ ४ दलघमी साठा उपलब्ध असून हे पाणी नांदेडकरांना पुढील दहा- बारा दिवस पुरेल एवढाच आहे़
जिल्ह्यात आतापर्यंत ८१़ ७ मि़ मी़ पाऊस झाला आहे़ मागील वर्षी या तारखेपर्यंत ४९५़ ९६ मि़ मी़ पाऊस पडला होता़ यावर्षी सर्वच नक्षत्र कोरडे गेल्यामुळे नद्या, नाले, तलावही कोरडेच राहिले़ जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट असतानाच नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णूपुरी प्रकल्पाची पाणीपातळी कमालीची खालावली आहे़ या प्रकल्पात केवळ ४ दलघमी साठा असून शहराला दोन दिवसाआड पाणी सोडल्यास दहा, बारा दिवसच हे पाणी पुरणार असल्याचे उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांनी सांगितले़
मागील दोन वर्षांपासून अल्पपावसामुळे विष्णूपुरी प्रकल्पातील उपलब्ध असलेल्या पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे़ ऐन उन्हाळ्यात दोन, तीन दिवसाआड पाणी सोडावे लागले़ यावर्षी पावसाने सरासरी ओलांडल्यामुळे विष्णूपुरी प्रकल्पात ७५ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला होता़ जानेवारीपासून एक दिवसाआड पाणी सोडण्यात येत होते़
तर मागील दहा दिवसांपासून शहराला दोन दिवसाआड पाणी सोडण्यात येत आहे़ शहराला दोन दिवसाआड २५ क्युसेस पाणी सोडले जाते़ त्यामुळे पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे़ यासंदर्भात उपायुक्त वाघमारे म्हणाले, विष्णूपुरी प्रकल्पातील पाणीसाठा कमी होत असला तरी दिग्रस बंधारा तसेच येलदरी प्रकल्पात आवश्यक साठा उपलब्ध आहे़
दिग्रस बंधाऱ्यात १८ दलघमी साठा आहे़ मात्र परभणीच्या नागरिकांचा हे पाणी नांदेडला सोडण्यास विरोध होत आहे़ याबाबत सोमवारी परभणी येथे बैठक घेण्यात आली आहे़ येत्या दोन- तीन दिवसांत याबद्दल निर्णय होईल़ राज्य शासनाच्या आदेशानुसार प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी वापरण्यात येणार आहे़ त्यामुळे दिग्रसचे पाणी नांदेडला सोडावेच लागेल़
जिल्ह्यात ८१़७ मि़ मी़ पाऊस
जिल्ह्यात आतापर्यंत ८१़०७ मि़ मी़ पाऊस झाला आहे़ मागील २४ तासांत जिल्ह्यात ३़ ४ मि़ मी़ सरासरी पावसाची नोंद आहे़ तालुकानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे, कंसातील आकडे आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाचे़ नांदेड ३़६३ (९१़७१), मुदखेड ०़३३ (६६़३३), अर्धापूर १़०० (५७़ ६७), भोकर १़२५ (१११़९५), उमरी ७़०० (९४़ ४०), कंधार १़ ३३ (७३़ ६४ ), लोहा ५़३३ ( ९२़८३), किनवट ६़०० ( ८७़९९), माहूर ५़५० (१०३़८७), हदगाव ०़७२ (३७़ ९०), हिमायतनगर १़३३ (२२़०१), देगलूर ५़०० (८१़०१ ), बिलोली निरंक (६५़०० ), धर्माबाद ५़०० (१०६़००), नायगाव २़६० (९९़४०), मुखेड २़५७ (१०२़४२)़ एकूण पाऊस ४८़५९ मि़ मी़ (प्रतिनिधी)
पाण्याचा अपव्यय टाळावा
विष्णूपुरी प्रकल्पात बारा दिवस पुरेल एवढा साठा असून पाऊस न झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे़ नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा़ बांधकाम किंवा इतर कामासाठी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन करण्यात आले आहे़
दिग्रस बंधाऱ्यातून पाणी सोडण्यास स्थानिक लोकांचा विरोध असल्याने नांदेडला पाणी सोडण्याबाबत अडचणी येत आहेत़ येत्या दोन- तीन दिवसांत याबाबत निर्णय होणार असल्याचे उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांनी सांगितले़