काठोकाठ भरलेले विष्णूपुरी अंधारात
By Admin | Updated: September 4, 2014 00:20 IST2014-09-04T00:05:42+5:302014-09-04T00:20:47+5:30
नांदेड : नांदेड शहर व परिसराची भिस्त असलेला विष्णूपुरी प्रकल्प गेल्या वर्षभरापासून अंधारातच आहे़

काठोकाठ भरलेले विष्णूपुरी अंधारात
नांदेड : नांदेड शहर व परिसराची भिस्त असलेला विष्णूपुरी प्रकल्प गेल्या वर्षभरापासून अंधारातच आहे़ थकित २० कोटी व चालू ८० लाखांच्या वीजबिलापोटी वीज कंपनीने प्रकल्पाचा वीजपुरवठा खंडित केला आहे़ त्यामुळे सध्यातरी, जनित्रावरच धरणाचे दरवाजे उघडावे लागत आहेत़
गतवर्षी विष्णूपुरी धरण शंभर टक्के भरलेले असताना वीज कंपनीने थकबाकीपोटी प्रकल्पाचा वीजपुरवठा खंडित केला होता़ यापूर्वी प्रकल्पावर ४७ कोटींची थकबाकी होती़ त्यातील ३३ कोटी रुपये शासनाने माफ केले़ परंतु उर्वरित २० कोटींची थकबाकी भरणेही अवघड होवून बसले होते़ त्यामुळे त्यावरील व्याजाचा आकडा वाढतच गेला़
तर दुसरीकडे मागील वर्षीची ८० लाखांची थकबाकी हा विषयही अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत होता़ या प्रकारामुळे वीज कंपनीने वीजपुरवठाच खंडित करण्याचा निर्णय घेतला़ त्यामुळे धरण भरल्यावर दरवाजे कसे उघडावेत असा प्रश्न निर्माण झाला होता़ त्यानंतर जनित्राच्या सहाय्यानेच गतवर्षी प्रकल्पाचे दरवाजे उघडणे आणि बंद करण्यात आले़
त्यानंतर गेली वर्षभर हा प्रकल्प अंधारातच आहे़ यंदाही धरण १०० टक्के भरले आहे़ परंतु वीजजोडणीच नाही़ त्यामुळे बुधवारी जनित्राच्या सहाय्यानेच प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आला़
जनित्रासाठीही मोठ्या प्रमाणात डिझेल खर्ची पडत आहे़ त्यात प्रकल्पात पाणीसाठा वाढला अन् धरणाचे आणखी काही दरवाजे उघडण्याची वेळ आल्यास मात्र अडचण होणार आहे़ तर दुसरीकडे प्रकल्पावर रात्रीच्या वेळी कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांचे मात्र हाल होत आहेत़
या ठिकाणी त्यांना उघड्यावर झोपावे लागत असून पाणी जवळच असल्यामुळे विषारी साप आणि इतर प्राण्यांचाही येथे मुक्त संचार असतो़ त्यामुळे जीव मुठीत घेवून या कर्मचाऱ्यांना इथे दिवस काढावे लागत आहेत़ (प्रतिनिधी)