वाळूज-कमळापूर रस्त्याचे काम ग्रामस्थांनी बंद पाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 23:18 IST2019-03-10T23:18:31+5:302019-03-10T23:18:44+5:30
अंदाज पत्रकानुसार काम होत नसल्याचा आरोप करीत वाळूज-कमळापूर रस्त्याचे काँक्रिटीकरण करताना स्टीलचा वापर करण्याच्या मागणीसाठी काम नागरिकांनी बंद पाडले.

वाळूज-कमळापूर रस्त्याचे काम ग्रामस्थांनी बंद पाडले
वाळूज महानगर : अंदाज पत्रकानुसार काम होत नसल्याचा आरोप करीत वाळूज-कमळापूर रस्त्याचे काँक्रिटीकरण करताना स्टीलचा वापर करण्याच्या मागणीसाठी काम नागरिकांनी बंद पाडले. त्यामुळे परिसरातील वाहनधारकांची गैरसोय होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे वाळूज ते कमळापूर रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या रस्त्यासाठी जवळपास तीन कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. संबंधित ठेकेदाराकडून काही दिवसांपूर्वी या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र, रस्त्याचे काम अंदाज पत्रकानुसार होत नसल्याचा आरोप करुन ते बंद पाडले. संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी नागरिकांना अंदाज पत्रकाची प्रत दाखवत सदरील काम सुरु ठेवण्याची विनंती केली. मात्र, नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने ठेकेदाराला अखेर हे काम बंद करावे लागले. आता हे काम पुन्हा कधी सुरु होणार आणि पूर्णत्वाकडे केव्हा जाणार, असा सवाल ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे.
आठवडाभरापासून रस्त्याचे काम बंद असल्याने खडी व डब्बर अजूनही काही ठिकाणी तशीच पडून आहे. शिवाय रामराई टी पॉइंटपासून कमळापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर अंथरलेली खडी तशीच आहे. अर्धवट रस्ता झाल्यामुळे रस्त्यावर खड्डे झाले आहेत. शिवाय पर्यायी रस्ता नाही. त्यामुळे गावातील नागरिकांसह कमळापूर, रांजणगाव, रामराई आदी परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे.