ग्रामस्थांनी रोखले धान्यवाटप
By Admin | Updated: July 18, 2014 01:51 IST2014-07-18T00:48:22+5:302014-07-18T01:51:34+5:30
वसमत : तालुक्यातील वाखारी गावास रेशनचे धान्य व रॉकेल गेल्या चार महिन्यांपासून मिळाले नसल्याने ग्रामस्थांत संतापाचे वातावरण आहे.

ग्रामस्थांनी रोखले धान्यवाटप
वसमत : तालुक्यातील वाखारी गावास रेशनचे धान्य व रॉकेल गेल्या चार महिन्यांपासून मिळाले नसल्याने ग्रामस्थांत संतापाचे वातावरण आहे. गुरूवारी पुरवठा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व पोलिस बंदोबस्तात एक महिन्याचे रेशन वितरणाचा प्रयोग होत होता. संतप्त ग्रामस्थांनी चार महिन्याचे धान्य देण्याची मागणी करत धान्य घेण्यास नकार दिल्याने धान्य वितरण होवू शकले नाही.
तालुक्यात रेशनचे धान्य काळ्या बाजारात विकणाऱ्यांच्या टोळ्या उदयास आल्या आहेत. अन्नसुरक्षा योजनेचे धान्य लाभार्थ्यांपर्यंत जाण्याऐवजी काही स्वस्त धान्य दुकानदार काळ्या बाजार करणाऱ्यांना विकून मोकळे होत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.
तालुक्यातील वाखारी गावातील स्वस्त धान्य दुकानदारानेही चार महिन्यांपासून गावात धान्यच वितरीत केले नाही. कार्डधारक चकरा मारुन थकले तरी माल आला नाही, असेच उत्तर मिळते. या प्रकारासंदर्भात ग्रामस्थांनी पुरवठा विभागाकडे तक्रारीही केल्या; परंतु धान्य काही मिळाले नाही. ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेवून पुरवठा विभागाने गावास भेट देवून पंचनामाही केला आहे. जुलै महिन्यात उचललेले धान्य वाटप करण्यासाठी गुरूवारी नायब तहसीलदार आकुलवार, मंडळ अधिकारी श्याम कुरूंदकर, तलाठी कळसकर, पाटेकर हे वाखारीत पोहोचले. धान्य वाटपासाठी पोलिस बंदोबस्तही घेण्यात आला होता. ग्रामस्थ व लाभार्थ्यांनी चारही महिन्याचे धान्य द्या, अशी मागणी केली; परंतु एकाच महिन्याचे धान्य उपलब्ध असल्याने पेच निर्माण झाला. गावातील लाभार्थी आक्रमक झाले होते. चार महिन्यांचे धान्य व रॉकेल कोठे गायब झाले. याचा हिशोब मागत होते. अधिकारी दुपारी दोन वाजेपर्यंत दुकानात बसून राहिले मात्र एकाही ग्रामस्थाने एक महिन्याचे घेतले नसल्याने अधिकारी परत आले.
वाखारी गावात गेल्या वर्षभरापासून अधुन-मधून धान्य गायब होण्याचे प्रकार घडतात. धान्य सरळ काळ्या बाजारात जाते. मात्र पुरवठा विभाग लक्ष देत नाही. त्यामुळेच हा प्रसंग उद्भवल्याची तक्रार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ऋषीकेश बरवे, नागनाथ काठाळे, ग्रा. पं. सदस्य शंकर गोवंदे, गंगाधर गोवंदे, गोपाळराव निर्वळ, लक्ष्मीबाई गोवंदे, मुक्ताबाई गोवंदे, संघमित्रा गोवंदे, सुशिला गोवंदे आदींसह ग्रामस्थांनी केली. धान्य व रॉकेल गायब झाल्या प्रकारची चौकशी करावी, चारही महिन्याचे रेशन एकाचवेळी मिळावे व यापुढे दरमहा धान्य वाटपाची हमी मिळावी आदी मागण्यांही ग्रामस्थांनी यावेळी केल्या.
गावात फेरफटका मारला असता वाखारी गावातील धान्यासह इतर गावातील रेशनचे धान्य वाखारी येथे एका गोदामात साठवून पुर्णा मार्गे नांदेडच्या काळ्या बाजारात पाठवण्याचा धंदा करणारे रॅकेट कार्यरत असल्याची तक्रार ऐकावयास मिळाली. काळ्या बाजारातील धान्याचा साठा करण्याचे वाखारी हे केंद्र असल्याचेही अनेकांनी सांगितले. पोलिस पुरवठा विभागाच्या आशिर्वादानेच धान्याचा काळाबाजार होत असल्याची चर्चा आहे. वसमतपासून जवळच व मुख्य रस्त्यावर असलेल्या वाखारी गावात जर चार-चार महिने राशनचे धान्य जात नसेल तर आडमार्गाच्या गावांची काय अवस्था, याची कल्पना न केलेलीच बरी. वाखारी येथील पेचावर आता काय तोडगा निघतो? हे पाहणे रंजक ठरणार आहे.
या संदर्भात पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार आकुलवार यांच्याशी संपर्क साधला असता, ग्रामस्थांची चार महिन्याचे धान्य वाटण्याची मागणी आहे. आज एकाही लाभार्थ्याने धान्य घेतले नसल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामस्थांच्या तक्रारीवरुन ९ जुलै रोजीच पंचनामा करून रेशन दुकानाचा परवाना निलंबित करण्याची शिफारस करणारा अहवाल जिल्हा पुरवठा विभागास पाठवला असल्याचे आकुलवार यांनी सांगितले. (वार्ताहर)