ग्रामीणच्या घंटागाड्या शहरात
By Admin | Updated: April 30, 2015 00:35 IST2015-04-30T00:21:46+5:302015-04-30T00:35:08+5:30
जालना : दीड महिन्यांपूर्वी ६२ ग्रामपंचायतींना वितरीत केलेल्या घंटागाड्या परत शहरात आणण्यात आल्याने त्या गावांमधील कचरा कायम आहे.

ग्रामीणच्या घंटागाड्या शहरात
जालना : दीड महिन्यांपूर्वी ६२ ग्रामपंचायतींना वितरीत केलेल्या घंटागाड्या परत शहरात आणण्यात आल्याने त्या गावांमधील कचरा कायम आहे. मात्र ही वाहने आरटीओकडून परवाना प्राप्त करून घेण्यासाठी आणल्याचे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले.
राज्यात पुणे शहरानंतर जालना जिल्ह्यात ग्रामपंचायतींना घंटागाड्यांचे वितरण करण्यात आले. गावांमधील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेने ६२ ग्रामपंचायतींसाठी पहिल्या टप्प्यात घंटागाड्या खरेदी केल्या.
घंटागाड्या सुरू झाल्याने गाव कचरामुक्त होईल, असे वाटत असतानाच या गाड्या परत जालन्यात आणण्यात आल्या. त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावणे सध्यातरी बंद आहे.
ही सर्व वाहने जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानाच्या आवारात लावण्यात आलेली आहेत. याबाबत जि.प. पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी.टी. केंद्रे म्हणाले की, एवढ्या मोठ्या संख्येने असलेली ही नवीन वाहने ठेवण्यासाठी सुरक्षित जागा म्हणून आम्ही तेथे वाहने ठेवलेली आहेत. त्याचप्रमाणे पहिल्या टप्प्यात आणलेल्या ३२ वाहनांची परवान्यासाठी नोंदणी करण्यात आली. परंतु पुन्हा आणलेल्या ३० वाहनांची नोंदणी करताना आरटीओ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी पूर्वीच्या ३२ वाहनांनाही त्यासमवेत आणावे, अशी सूचना केली. त्यामुळे ही सर्व वाहने टप्प्याटप्प्याने शहरात आणण्यात आली आहेत. सोमवारी या वाहनांची परवाना नोंदणी अपेक्षित असल्याचे केंद्रे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)