ग्रामस्थांनी केला खड्ड्यांचा वाढदिवस
By Admin | Updated: August 31, 2014 00:14 IST2014-08-31T00:00:08+5:302014-08-31T00:14:12+5:30
नांदेड: नागपूर-नांदेड-तुळजापूर या रस्त्याचे काम करण्यात आले़ परंतु या ठिकाणी पडलेल्या खड्डयांची डागडुजी मात्र गेल्या एक वर्षापासून करण्यात आली नाही़

ग्रामस्थांनी केला खड्ड्यांचा वाढदिवस
नांदेड: नागपूर-नांदेड-तुळजापूर या रस्त्याचे काम करण्यात आले़ परंतु या ठिकाणी पडलेल्या खड्डयांची डागडुजी मात्र गेल्या एक वर्षापासून करण्यात आली नाही़ त्या विरोधात गांधीगिरी पद्धतीने नागरिकांनी केक कापून रस्त्याचा वाढदिवस साजरा केला़
जिल्ह्यात बहुतांश रस्त्यांवर खड्ड्यांची मालिकाच पहावयास मिळते़ प्रशासनाकडून दरवर्षी हे खड्डे बुजविण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या निविदाही काढण्यात येतात़ कंत्राटदाराकडून खड्डेही बुजविण्यात येतात़ परंतु काही दिवसातच खड्डे पुन्हा उघडे पडतात़ अशापद्धतीने खड्डयासाठी आलेला निधी खड्डयात घालण्याचा बिनबोभाट कारभार सध्या जिल्ह्यात सुरु आहे़ या खड्ड्यांमुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत़ परंतु त्याबाबत गांभीर्याने कुणीही विचार करीत नाही़ अशाचप्रकारे नागपूर-नांदेड-तुळजापूर या महामार्गाचे काम करण्यात आले़ परंतु त्यावर आता मोठ-मोठे खड्डे पहावयास मिळतात़
गेल्या एक वर्षापासून या खड्ड्यांची डागडुजी करण्यात आली नाही़ त्यामुळे या भागातील ग्रामस्थांनी या खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला़ त्यानुसार, शनिवारी रस्त्यावरील खड्ड्यातच केक कापून शासनाचा निषेधही नोंदविला़ ग्रामस्थांच्या या आगळ्यावेगळ्या आंदोलनामुळे मात्र या रस्त्यावरील वाहतूक बराच काळ खोळंबली होती़
यावेळी गंगाधर कवाले पाटील, दौलतराव सावंत, शिवराज पाटील घोरपडे, गोविंद शिंदे, प्रभाकर गायकवाड, रावसाहेब शिंदे, धनंजय जाधव, शरद भालके, राम पाटील शिंदे, माधव देशमुख, गणेश कवाले, लक्ष्मण कवाले आदींची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)
नागपूर-नांदेड-तुळजापूर रस्त्यावर खड्डेच खड्डे
खड्ड्यांना झाले एक वर्ष