दिगाव येथील पुलाचे काम निकृष्ट होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:05 IST2021-06-18T04:05:11+5:302021-06-18T04:05:11+5:30
सप्टेंबर २०२० मध्ये परिसरात अतिवृष्टी झाल्याने पूर्णा नदीला महापूर आला होता. या पुरात दिगाव येथील नळकांडी पूल पूर्णपणे वाहून ...

दिगाव येथील पुलाचे काम निकृष्ट होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप
सप्टेंबर २०२० मध्ये परिसरात अतिवृष्टी झाल्याने पूर्णा नदीला महापूर आला होता. या पुरात दिगाव येथील नळकांडी पूल पूर्णपणे वाहून गेला होता. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना गेल्या काही महिन्यांपासून अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. याविषयी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून या विषयाला वाचा फोडल्यानंतर पुलाच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हाती घेण्यात आले. या कामासाठी ३५ लाख ३८ हजार रुपये निधी खर्च करण्यात येणार आहे. मात्र, ऐन पावसाळ्याच्या तोंडी हे काम सुरू करण्यात आले आहे. सुरुवातीपासूनच संबंधित ठेकेदाराने निकृष्ट कामाचा सपाटा लावला आहे. नळकांड्या टाकण्यासाठी पाया खोदून काँक्रिटीकरण करणे अपेक्षित होते. मात्र, यासाठी विहिरीच्या निकृष्ट डब्बरचा वापर करून थातूर-मातूर काँक्रिटीकरण करून नळकांड्या टाकण्यात आल्या. तसेच पुलाला लागूनच मातीमिश्रित वाळू काढून तिचा बांधकामात वापर केला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या कामाकडे सा. बां.च्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने ठेकेदाराने निकृष्ट कामाचा धडाका लावल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पुलाचे काम चांगल्या प्रतीचे करावे, अशी मागणी दिगावचे तंटामुक्ती अध्यक्ष प्रल्हाद काकडे, शिवाजी मुरमुडे, अवचित भुंबरे, बाळू कुंभारे, पोपट मुरमुडे, बाळू सुसुंद्रे, पुंडलिक सुसुंद्रे, धनाजी गवळी, आदींसह ग्रामस्थांनी केली आहे.