आपत्ती व्यवस्थापनासाठी गावनिहाय आराखडा

By Admin | Updated: August 1, 2014 01:08 IST2014-08-01T00:58:05+5:302014-08-01T01:08:50+5:30

सुनील कच्छवे, औरंगाबाद महापूर, भूकंप आणि दरड कोसळण्यासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात तातडीने मदतकार्याला सुरुवात करता

Village wise plan for disaster management | आपत्ती व्यवस्थापनासाठी गावनिहाय आराखडा

आपत्ती व्यवस्थापनासाठी गावनिहाय आराखडा

सुनील कच्छवे, औरंगाबाद
महापूर, भूकंप आणि दरड कोसळण्यासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात तातडीने मदतकार्याला सुरुवात करता यावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभाग उपलब्ध साधनांचा गावनिहाय आराखडा तयार करीत आहे. त्यासाठी प्रत्येक गावात आणि जवळपास भागात उपलब्ध साधनांची तसेच सुविधांची इत्थंभूत माहिती मागविण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील माळीण गावातील दुघर्टनेच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या तयारीचा आढावा घेतला. जिल्ह्यात दरवर्षी पावसाळ्यापूर्वी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला जातो. यंदाही जिल्हा प्रशासनाने असा आराखडा तयार केला आहे. त्यात महानगरपालिका, नगर परिषदा तसेच जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध बोटी, अग्निशमन वाहन, जीवरक्षक साहित्याची माहिती असते. जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाने आता याही पुढे जाऊन प्रत्येक गावाच्या दृष्टीने अशी माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले आहे. जिल्ह्यात कोणत्या गावात नैसर्गिक संकटाचा धोका होऊ शकतो हे लक्षात घेऊन त्या गावात तातडीने मदत कुठून पोहोचू शकते, जवळपासच्या कोणत्या गावात कुणाकडे क्रेन, जेसीबी आहे, सर्वांत जवळ कोणत्या ठिकाणी अ‍ॅम्ब्युलन्स आहे, त्यांचे मोबाईल क्रमांक आदींची माहिती संबंधित गावांकडून मागविण्यात आली आहे.
आपत्ती व्यवस्थापन अधिकारी हरिहर पत्की यांनी सांगितले की, एखाद्या ठिकाणी आपत्ती उद्भवल्यास कमीत कमी वेळेत मदत पोहोचणे गरजेचे असते. त्या दृष्टीने मदतकार्यात लागणारे साहित्य जसे जेसीबी, क्रेन, अ‍ॅम्ब्युलन्स आदींची माहिती आवश्यक आहे. आपत्ती व्यवस्थापन आराखड्यात ही संपूर्ण माहिती गावनिहाय असणार आहे. पुणे येथील यशदा संस्थेकडून आलेल्या नमुन्यात ही माहिती संकलित केली जात आहे. यासंदर्भात शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलाविली असून, त्यासाठी संबंधित नायब तहसीलदार, कर्मचाऱ्यांना बोलाविण्यात आले आहे.
१० वर्षांतील आपत्तीचाही डाटा
गावनिहाय सुविधांची माहिती संकलित करतानाच गेल्या १० वर्षांतील आपत्तींचा आढावा घेण्यात येत आहे. मागील दहा वर्षांच्या काळात कोणकोणत्या गावांत महापूर आला, भूकंप झाला किंवा दरड कोसळली याची माहितीही त्या तहसील कार्यालयांकडून मागविण्यात आली आहे.

Web Title: Village wise plan for disaster management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.