आठ दिवसांपासून फळा गाव अंधारात
By Admin | Updated: May 14, 2014 00:48 IST2014-05-14T00:42:10+5:302014-05-14T00:48:37+5:30
पालम : तालुक्यातील फळा येथे रोहित्र जळाल्याने मागील आठ दिवसांपासून गावात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

आठ दिवसांपासून फळा गाव अंधारात
पालम : तालुक्यातील फळा येथे रोहित्र जळाल्याने मागील आठ दिवसांपासून गावात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे ग्रामस्थांचे हाल होत असून वीज कंपनी दुर्लक्ष करीत आहेत. फळा गावात वीजपुरवठा करण्यासाठी कंपनीने रोहित्र बसविले आहे. यापैकी गावाला वीजपुरवठा करणारे रोहित्र जळून खाक झाले आहे. मागील आठ दिवसांपासून यामुळे अंधार पडला आहे. वीज नसल्याने ग्रामस्थांना पिण्याचे पाणी, मोबाईल चार्जिंग करताना अडथळा निर्माण झाला आहे. तसेच पिठाच्या गिरण्या बंद पडल्या आहेत. फळा गावात सप्ताह सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात भाविकवर्ग येत आहे. दररोज रात्री कीर्तन ऐकण्यासाठी पंचक्रोशीतील वारकरी येत असतात. अंधार पडल्याने भाविकांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ग्रामस्थांनी वारंवार रोहित्र बसविण्याची मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. कंपनीने तातडीने नवीन रोहित्र बसवावे व वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी सरपंच तुकाराम पौळ, व्यंकटी पौळ, अर्जुन पौळ, नारायण पौळ, अशोक पौळ आदींच्या वतीने करण्यात आली आहे. (प्रतिनिधी) रोहित्र जळून खाक पालम तालुक्यातील फळा गावातील रोहित्र आठ दिवसांपूर्वी जळाले. या रोहित्राची दुरुस्ती न केल्याने गावात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. ग्रामस्थ भ्रमणध्वनी चार्ज करण्यासाठी शहर व इतर गावात जात आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीवर जावे लागत आहे. वीज वितरण कंपनीकडे दुरुस्त मागणी करूनही याकडे दुर्लक्ष होत आहे.