छत्रपती संभाजीनगर: शहरातील सातारा परिसरात तीन दरोडेखोरांनी सशस्त्र प्रवेश करत दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. द्वारकादासनगर येथील या घटनेत सतर्कत नागरिकांनी वेळीच एकजूट दाखवत प्रतिकार केल्याने दरोडेखोर आल्या पावली मागे हटत बाइकवरून पसार झाले. या थरारक घटनाक्रमाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
बीड बायपासवरील सातारा परिसरातील एमआयटी कॉलेज समोर द्वारकादासनगर आहे. येथील सुमंगल रेसिडेन्सीमध्ये मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास तीन दरोडेखोरांनी प्रवेश केला. याची चाहूल तेथील रहिवाशांना लागली. लागलीच सर्व रहिवाशांनी एकजूट दाखवत दरोडेखोरांना प्रतिकार केला. रहिवाशांचे आक्रमक रूप पाहून दरोडेखोरांनी हातातील शस्त्र घेऊन धावून आले. मात्र, रहिवाशी मागे फिरत नसल्याने दरोडेखोरांनी तेथून काढता पाय घेतला. तिघेही एका बाइकवर बसून परिसरातून पसार झाले.
दरोडेखोरांचा हल्ला; व्हिडिओ व्हायरलद्वारकादासनगर येथील एका अपार्टमेंटमध्ये दरोडेखोर घुसल्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. परिसरातील रहिवाशांच्या हे लक्षात येताच त्यांनी एकत्र येत प्रतिकार केला. मात्र, एका दरोडेखोर धारदार शस्त्र घेऊन रहिवाशांवर धावून आला. तर इतर दोघे बाइकवर बसून पुढे आले. रहिवाशी दूर गेल्याने तिसरा दरोडेखोर देखील पळत जाऊन बाइकवर बसला. धारदार शस्त्र असल्याने त्यांच्याजवळ रहिवाशी जाऊ शकले नाहीत. यातच तिघेही बाइकवरून पसार होण्यात यशस्वी झाले. यावेळी दरोडेखोर पिटाळून लावण्यात नागरिकांना यश आले असले तरी या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे.