सतर्क पोलिसांनी रोखला बाल विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 18:54 IST2017-08-11T18:51:09+5:302017-08-11T18:54:59+5:30
एका १६ वर्षीय मुलीचा साखरपुड्यातच विवाह होणार असल्याची माहिती मिळताच सतर्क हर्सूल पोलिसांनी तात्काळ मुलीचे घर गाठले. यावेळी आपली चूक वधूपित्याच्या लक्षात आली आणि त्यांनी साखरपुडा आणि विवाहाचा कार्यक्रम रद्द केला.

सतर्क पोलिसांनी रोखला बाल विवाह
ऑनलाईन लोकमत
औरंगाबाद, दि. ११ : एका १६ वर्षीय मुलीचा साखरपुड्यातच विवाह होणार असल्याची माहिती मिळताच सतर्क हर्सूल पोलिसांनी तात्काळ मुलीचे घर गाठले. यावेळी पोलिसांनी मुलीचे आईवडिल आणि नातेवाईकांना अल्पवयीन मुलीचे विवाह करणे कायद्याने गुन्हा आहे. यामुळे तुम्हाला हा विवाह करता येणार नाही,असे स्पष्ट केले. यावेळी आपली चूक वधूपित्याच्या लक्षात आली आणि त्यांनी साखरपुडा आणि विवाहाचा कार्यक्रम रद्द केला.
लग्नासाठी मुलीचे वय १८ तर मुलाचे २१ वर्ष कायद्यानुसार निश्चित करण्यात आले आहे. लग्नाच्या वेळी वधू अथवा वराचे वय कमी असेल तर तो बालविवाह मानला जातो. असा विवाह होणे बालविवाह कायद्याने गुन्हा ठरविण्यात आला आहे. असे असताना आपल्या १६ वर्षीय मुलीचे एका मुलासोबत प्रेमसंबंध असल्याची कुणकुण लागल्याने तिच्या आईवडिलांना लागली होती. वय वर्ष १६ हे धोक्याचे असे गमतीने म्हटले जाते. मात्र, या मुलीच्या आईवडिलांना खरेच ते धोक्याचं जाणवू लागल्याने त्यांनी तिचे लग्न ठरविले आणि आज शुक्रवारी साखरपुड्यात तिचा विवाह एका धार्मिक स्थळी उरकण्याची तयारी सुरू केली.
हर्सूल परिसरातील फुलेनगरात हा विवाह होणार असल्याची कुणकुण हर्सूल पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनीष कल्याणकर यांना लागली. मात्र कोणाच्या घरी विवाह होणार आहे आणि वधूपित्याचे नाव आणि पत्ताही त्यांना माहित नव्हता. असे असताना पो.नि. कल्याणकर यांनी प्रथम फुलेनगरात सध्या वेशातील पोलिसांना पाठवून असा एखादा विवाह आज होत आहे का, याबाबत खात्री केली. तेव्हा त्यांना वधूपित्याचे आणि मुलीचे नाव कळाले. त्यानंतर कल्याणकर यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली थेट वधूपित्याचे घर गाठले आणि मुलीची जन्मदाखला त्यांना सादर करण्याचे सांगितले. तेव्हा वधूपित्याने सारवासारव करीत आज आम्ही केवळ साखरपुडा करणार आहे, मुलीचे लग्न करणार नसल्याचे पोलिसांना सांगितले.
बालविवाह लावणे कायद्याने गुन्हा आहे,असा सज्जड दम देत पोलिसांनी त्यांचे समुपदेशन केले. मुलीचे वय शिकण्याचे असल्याने तिला शिकवून तिच्या पायावर उभे करा,असा सल्ला त्यांनी दिला. शिवाय वधूपित्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. यावेळी मुलीच्या पित्याने आणि नातेवाईकांनी पोलिसांचे म्हणने मान्य करीत सध्या त्यांच्या कन्येसाठी वर संशोधन आणि साखरपुडा करणार नसल्याची ग्वाही पोलिसांना दिली.