व्हीडीओग्राफी पथकाने सभांचे चित्रीकरण काळजीपूर्वक करावे
By Admin | Updated: October 6, 2014 00:11 IST2014-10-05T23:59:20+5:302014-10-06T00:11:38+5:30
हिंगोली : व्हीडीओग्राफरने सर्व बाबींचे चित्रीकरण अत्यंत काळजीपूर्वक करण्याची सूचना निवडणूक निरीक्षक (खर्च) दर्शन गौडा यांनी केली आहे.

व्हीडीओग्राफी पथकाने सभांचे चित्रीकरण काळजीपूर्वक करावे
हिंगोली : जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघाकरिता नियुक्त करण्यात आलेल्या व्हीडीओ सर्व्हिलिअन्स टीममधील व्हीडीओग्राफरने उमेदवारांच्या सभा व रॅलीमधील खर्चाशी संबंधित सर्व बाबींचे चित्रीकरण अत्यंत काळजीपूर्वक करण्याची सूचना निवडणूक निरीक्षक (खर्च) दर्शन गौडा यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी सायंकाळी सहाय्यक निवडणूक निरीक्षक व खर्च नियंत्रणाशी संबंधित सर्व पथक प्रमुखांच्या बैठकीत गौडा मार्गदर्शन करीत होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र परळीकर, खर्च नियंत्रण समितीचे नोडल अधिकारी सुरेश केंद्रे, समन्वयक अतुल गावडे, संपर्क अधिकारी विशाल जाधवर, एमसीएमसीचे सचिव सुनील सोनटक्के, सहाय्यक निवडणूक निरीक्षक किरण कोल्हे (हिंगोली), मनोज गग्गड (वसमत), राठोड (कळमनुरी) आदी उपस्थित होते.
निरीक्षक गौडा म्हणाले की, खर्च नियंत्रण समिती अंतर्गत असलेल्या व्हीव्हीटी, व्हीएसटी, एसएसटी पथकांकडून संबंधित विधानसभांचे सहाय्यक निवडणूक निरीक्षकांनी काळजीपूर्वक काम करून घेणे आवश्यक आहे. कोणत्याही उमेदवारांच्या राजकीय सभा, रॅलीमधील निवडणूक खर्चाशी संबंधित कोणतीही बाब कॅमेऱ्यामधून सुटता कामा नये, असे त्यांनी सांगितले.
तसेच सर्व सहाय्यक निवडणूक निरीक्षकांनी त्यांच्याकडे असलेल्या पथकांमधील सर्व व्हिडीओग्राफरला चित्रीकरणाबाबत योग्य ती माहिती देऊन त्यांच्याकडून काटेकोरपणे चित्रीकरण करून सदरचा खर्च उमेदवारांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्याची कार्यवाही करावी, असेही गौडा यांनी सांगितले. निवडणूक कालावधीत खर्च नियंत्रण समितीची अत्यंत महत्वाची भूमिका असल्याने प्रत्येक सदस्याससने जबाबदारीने काम करण्याची सूचना गौडा यांनी केली.
तसेच सहाय्यक निवडणूक निरीक्षकांनी अधिक तत्परतेने काम करावे, असे सांगितले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी परळीकर यांनीही वसमत, कळमनुरी व हिंगोली विधानसभा मतदार संघातील सहाय्यक निवडणूक निरीक्षकांनी व्हीएसटी व व्हीव्हीटी पथकामधील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्याची सूचना केली. (जिल्हा प्रतिनिधी)