महाराष्ट्राच्या विजयात बीडची मुक्ता मगरे चमकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 23:56 IST2018-02-26T23:55:56+5:302018-02-26T23:56:21+5:30
राजकोट येथे सुरू असलेल्या महिलांच्या २३ वर्षांखालील झोनल वनडे क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राने बडोदा संघावर ४९ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या लढतीत बीडची खेळाडू मुक्ता मगरे हिने निर्णायक योगदान दिले. महाराष्ट्राचा हा सलग दुसरा विजय ठरला.

महाराष्ट्राच्या विजयात बीडची मुक्ता मगरे चमकली
औरंगाबाद : राजकोट येथे सुरू असलेल्या महिलांच्या २३ वर्षांखालील झोनल वनडे क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राने बडोदा संघावर ४९ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या लढतीत बीडची खेळाडू मुक्ता मगरे हिने निर्णायक योगदान दिले. महाराष्ट्राचा हा सलग दुसरा विजय ठरला.
आज झालेल्या या लढतीत कर्णधार देविका वैद्य आणि मुक्ता मगरे यांनी सलामीसाठी २६.४ षटकांत केलेल्या १२७ धावांच्या भागीदारीच्या बळावर महाराष्ट्राने ५0 षटकांत ७ बाद २३३ धावा फटकावल्या. महाराष्ट्राकडून देविका वैद्य हिने ७४ चेंडूंत ९ चौकारांसह ६९, तर मुक्ता मगरे हिने ९२ चेंडूंत ६ चौकारांसह ५७ धावांची सुरेख खेळी केली. या दोघींशिवाय शिवाली शिंदेने ४२ चेंडूंत ५ चौकारांसह ४0 धावांचे योगदान दिले. बडोदा संघाकडून एन. पटेल हिने ४१ धावांत ३ गडी बाद केले. रिद्धी मौर्य हिने ४४ धावांत २ बळी घेतले.
प्रत्युत्तरात बडोद्याचा संघ ५0 षटकांत ६ बाद १८४ या धावसंख्येपर्यंतच मजल मारू शकला. त्यांच्याकडून ऋत्विषा हिने ६९ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ६९ धावांची झुंजार खेळी केली. एन. पटेलन २७ धावांचे योगदान दिले. महाराष्ट्राकडून निकिता भोर, शिवानी भुकटे, माया सोनवणे व तेजल हसबनीस यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र : ५0 षटकांत ७ बाद २३३. (देविका वैद्य ६९, मुक्ता मगरे ५७, शिवाली शिंदे ४0. एन. पटेल ३/४१, रिद्धी मौर्य २/४४).
बडोदा : ५0 षटकांत ६ बाद १८४. (ऋत्विषा ७३, एन. पटेल २७. निकिता भोर १/२८, शिवानी भुकटे १/३७, माया सोनवणे १/२५, तेजल हसबनीस १/१२).