पाण्याने घेतला शेतकऱ्यासह वृद्धाचा बळी
By Admin | Updated: May 12, 2015 00:50 IST2015-05-12T00:21:03+5:302015-05-12T00:50:04+5:30
लोहारा / ईट : अंघोळीसाठी गेलेल्या एका ६० वर्षीय वद्धाचा विहिरीत बुडून तर शेतातील विहिरीतून पाणी काढणाऱ्या शेतकऱ्याचाही पाय घसरून पाण्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला़

पाण्याने घेतला शेतकऱ्यासह वृद्धाचा बळी
लोहारा / ईट : अंघोळीसाठी गेलेल्या एका ६० वर्षीय वद्धाचा विहिरीत बुडून तर शेतातील विहिरीतून पाणी काढणाऱ्या शेतकऱ्याचाही पाय घसरून पाण्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला़ या घटना लोहारा व वडाचीवाडी (ता़भूम) शिवारात रविवारी दुपारी व सोमवारी सकाळी घडल्या असून, या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ दरम्यान, लोहारा शहरासह वडाचीवाडी येथे पाण्याची टंचाई असून, पाणीटंचाईनेच वृद्धांसह शेतकऱ्याचा बळी घेतल्याचे दिसत आहे़
याबाबत अधिक वृत्त असे की, लोहारा शहरात मागील दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ सध्या प्रशासनाकडून सहा टँकरद्वारे शहराला पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे़ शहरातील पाणीटंचाई तीव्र झाल्याने प्रसंगी नागरिकांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागते़ शहरातील अरविंद बळवंतराव पाटील (वय-६०) हे सोमवारी सकाळी शहरालगत असलेल्या शिवलिंगप्पा जट्टे यांच्या शेतातील विहिरीवर अंघोळीसाठी गेले होते़ त्यावेळी पाय घसरून आतमध्ये पडल्याने अरविंद पाटील यांचा मृत्यू झाला़ शिवलिंगप्पा जट्टे हे वीज आल्यानंतर मोटार सुरू करण्यासाठी विहिरीवर गेले होते़ त्यावेळी त्यांना पाण्यात प्रेत तरंगताना दिसले़ घटनेची माहिती कळताच लोहारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पार्थिव बाहेर काढले़ याबाबत चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून लोहारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भूम तालुक्यातील वडाचीवाडी येथेही काही प्रमाणात पाण्याची टंचाई आहे़ येथील शेतकरी ईश्वर नेरे (वय ५८) हे रविवारी दुपारी स्वत:च्या शेताकडे गेले होते. शेतातील विहिरीतील पाणी काढत असताना तोल जावून पाण्यात पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी गौतम बोलभट यांनी दिलेल्या माहितीवरून भूम पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोहेकॉ ए. पी. भोसले करीत आहेत. (वार्ताहर)