मुदखेडातील मोकाट कुत्र्यांनी घेतला सुजय भोसकरचा बळी
By Admin | Updated: July 5, 2014 00:42 IST2014-07-04T23:42:24+5:302014-07-05T00:42:47+5:30
मुदखेड : येथील पालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला. मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याने सुजय भोसकर या विवाहित तरुणांचा नाहक बळी गेल्याची घटना ४ जुलै रोजी घडली.
मुदखेडातील मोकाट कुत्र्यांनी घेतला सुजय भोसकरचा बळी
मुदखेड : येथील पालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला. मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याने सुजय भोसकर या विवाहित तरुणांचा नाहक बळी गेल्याची घटना ४ जुलै रोजी घडली.
जवळपास दीड महिन्यांपूर्वी रात्रीच्या वेळी लघूशंकेनिमित्त सुजय भोसकर (वय ३२) हे उठले होते. यादरम्यान त्यांचा पाय एका कुत्र्यावर पडला, त्याच कुत्र्याने सुजय यांच्या पायाला चावा घेतला. सुजयने लगेच मुदखेडचे शासकीय रुग्णालय गाठले आणि रेबीजचे इंजेक्शन टोचून देण्याची विनंती केली, मात्र मुदखेडच्या रुग्णालयात रेबीजचे इंजेक्शन नसल्याने डॉक्टरांनी सुजय यांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात जावून रेबीजचे इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला.
दरम्यान, यातच २ जुलै सायंकाळी रोजी पाणी घेवून तोंड धुताना सुजय यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना ३ जुलै रोजी सकाळी नांदेड येथील खाजगी रुग्णालयात आणण्यात आले. सुजय भोसकर यांना ‘रेबीज’ झाल्याचे निदान झाल्याने डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार सुजय यांना सायंकाळी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले, ४ जुलै रोजी पहाटे ३.२० च्या दरम्यान उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
औरंगाबाद येथून शववाहिनीने त्यांचे शव सकाळी १०.३० च्या दरम्यान मुदखेड येथे आणण्यात येवून दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भाऊ सुशांत यांनी भडाग्नी दिला. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. मुदखेड येथील डॉ. सखाराम ऊर्फ बंडू भोसकर यांचे ते द्वितीय चिरंजीव होत. (वार्ताहर)
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा- नागरिकांचे साकडे
दरम्यान, सुजय भोसकर यांच्या अकाली निधनाने मुदखेडकरांना धक्का बसला. मुदखेडच्या प्रत्येक सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग असायचा. मुदखेडातील मोकाट कुत्र्यांबद्दल नागरिकांनी वेळोवेळी पालिकेचे लक्ष वेधले, मात्र पालिकेने दुर्लक्ष केल्याने मोकाट कुत्र्यांची संख्या मुदखेडात प्रचंड वाढली आहे. अशाच कुत्र्यांनी चावा घेतल्याने सुजय भोसकर यांचा बळी गेला. या घटनेनंतरही पालिका जागे होणार की नाही? मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणार की नाही? असा संतप्त सवाल मुदखेडकर जनता पालिकेला करीत आहे.