पोलीस ठाण्यातील जप्त वाहनांचा होणार लिलाव
By Admin | Updated: December 24, 2014 01:00 IST2014-12-24T00:46:30+5:302014-12-24T01:00:19+5:30
जालना : जिल्ह्यातील १८ पोलिस ठाण्यांमध्ये जप्त करून ठेवण्यात आलेली वाहने लिलावाद्वारे निकाली काढण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे.

पोलीस ठाण्यातील जप्त वाहनांचा होणार लिलाव
जालना : जिल्ह्यातील १८ पोलिस ठाण्यांमध्ये जप्त करून ठेवण्यात आलेली वाहने लिलावाद्वारे निकाली काढण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. त्यातील कायदेशीर अडचणी दूर झाल्यानंतर किमान दोन महिन्यांत वर्षानुवर्षे पडून असलेली वाहने लिलावाद्वारे विकली जाणार आहेत.
शहरासह जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये जागा अडविणाऱ्या पोलीस ठाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहने उभी आहेत. या वाहनांची संख्या जवळपास ७४० असल्याचे पोलिसांनी सांगितले. तीन व चार चाकी वाहनांची संख्या ३५ आहे. ही वाहने निर्लेखित करण्यासाठी पोलिसांनी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न चालविले आहेत. मात्र त्यांना यश आले नाही. वाहनांचा लिलाव करण्यासाठी सर्वप्रकारची उपाय योजना केली जात आहे. यातील वाहने चोरी, अपघातग्रस्त, अथवा बेवारस आढळून आलेली आहे. संबंधित पोलिस ठाण्यांकडून वारंवार या वाहनांविषयी जनजागृती करून ती मालकांनी घेऊन जावीत, असे आवाहन केले. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. बहुतांश वाहनांची कागदपत्रेच उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे मालकांनी ही वाहने घेण्यास असमर्थता दर्शविली. यासाठी कायदेशीर प्रक्रीया संबंधिताला पूर्ण करावी लागते. ही प्रक्रीया अजूनही अर्धवट स्थितीत आहे. मात्र लवकरच हे प्रकरण निकाली काढण्याचा निर्णय पोलीस दलाने घेतला आहे.
पोलीस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांनी यासंदर्भात सांगितले, यासंदर्भात न्यायालयाकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर कारवाई केली जाईल. न्यायालयात पुरावा म्हणून काही वाहनांची गरज पडू शकते. काही वाहनांचे चेसीस नंबर कंपन्यांही कळविण्यात येतात. त्यातील विलंबामुळे ही वाहने रखडली आहेत. (प्रतिनिधी)