शेतकऱ्यांना वाहन भाड्याचा भुर्दंड; आर्थिक कोंडी !
By Admin | Updated: March 4, 2017 00:26 IST2017-03-04T00:23:57+5:302017-03-04T00:26:15+5:30
लातूर : लातूर शहरासह जिल्हाभरातील शासकीय तूर खरेदी केंद्रावरील यंत्रणा कोलमडल्याने केंद्राबाहेर तूर घेऊन आलेल्या शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

शेतकऱ्यांना वाहन भाड्याचा भुर्दंड; आर्थिक कोंडी !
लातूर : लातूर शहरासह जिल्हाभरातील शासकीय तूर खरेदी केंद्रावरील यंत्रणा कोलमडल्याने केंद्राबाहेर तूर घेऊन आलेल्या शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. बारदाण्याअभावी हजारो क्विंटल वाहनांत गेल्या चार दिवसांपासून पडून आहे. या वाहनांच्या दररोजच्या भाड्याचा खर्च शेतकऱ्यांना नाईलाजास्तव करावा लागत आहे. या आर्थिक भुर्दंडाला संबंधित यंत्रणा जबाबदार असल्याचे संतप्त शेतकऱ्यांनी सांगितले.
लातूरच्या उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेडचे तूर खरेदी केंद्र आहे. या तूर खरेदी केंद्रावर लातूरसह इतर तालुक्यांतील शेतकऱ्यांनी आपली तूर विक्रीसाठी आणली आहे. एका गावातून किमान चार शेतकऱ्यांनी एका वाहनात ही तूर आणली आहे. प्रति दिवस या वाहनाला दोन ते अडीच हजार रुपये भाडे आहे. गेल्या चार दिवसांपासून या तुरीचा काटा न झाल्यामुळे तूर वाहनांतच पडून आहे. परिणामी, दिवसागणिक वाहनांचे भाडे वाढत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती आणि नाफेडचे अधिकारी या संबंधी शेतकऱ्यांना बोलायला तयार नाहीत. आज खरेदी सुरू होईल. उद्या होईल, असे सांगितले जात आहे. मात्र गेल्या चार दिवसांपासून आमच्या तुरीचा अजूनही काटा झाला नाही, अशी माहिती चाकूर तालुक्यातील झरी (बु.) येथील शेतकरी बालाजी मुर्के, नागनाथ स्वामी यांनी दिली. (प्रतिनिधी)