मारहाण करून वाहन लुटणारे गजाआड
By Admin | Updated: July 3, 2017 00:59 IST2017-07-03T00:57:36+5:302017-07-03T00:59:08+5:30
जालना : जालना-देऊळगावराजा रस्त्यावर चालकास मारहाण करून वाहन लंपास करणाऱ्या दोन संशयितांना गुन्हे शाखेच्या पथकाने चोवीस तासाच्या आत ताब्यात घेतले

मारहाण करून वाहन लुटणारे गजाआड
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना-देऊळगावराजा रस्त्यावर चालकास मारहाण करून वाहन लंपास करणाऱ्या दोन संशयितांना गुन्हे शाखेच्या पथकाने चोवीस तासाच्या आत ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून तीन लाख ४० हजार रुपये किमतीची दोन वाहने जप्त केली आहेत.
ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे बॉबी शिवाजी राऊत (२१, रा. राऊतनगर), शंकर उर्फ संतोष भोलेनाथ जाधव (२३, रा.खरपुडी, ह. मु. साईलॉज), अशी आहेत. पोलिस सूत्रांनी सांगितले, की जालना-देऊळगावराजा रस्त्यावर शनिवारी पहाटे साडेचारच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन संशयितांनी सय्यद वसीम सय्यद आसिफ (रा.अकोला) यांचे छोटा हत्ती वाहन अडविले. त्यांना वाहनातून खाली ओढत जबर मारहाण करून जखमी केले. त्यानंतर एकाने छोटा हत्तीसह व दुसऱ्या दुचाकीवरून पोबारा केला. या प्रकरणी सय्यद वसीम यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दरम्यान, वरील दोघा संशयितांनी हा गुन्हा केल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांचा शोध सुरू केला. दरम्यान, संशयित बॉबी राऊतला पोलिसांनी शनिवारी रात्री औरंगाबादेतून तर संतोष जाधव यास रविवारी सकाळी गायत्रीनगरातून ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व चोरलेले वाहन जप्त केले. मुद्देमाल हस्तगत केल्यामुळे दोघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, उपनिरीक्षक वारे, कमलाकर अंभोरे, गोकुळसिंग कायटे, संतोष सावंत, भालचंद्र गिरी, विनोद गडदे, समाधान तेलंग्रे, हिरामण फलटणकर, सचिन चौधरी, मदन बहुरे, विलास चेके यांनी ही कारवाई केली.