माजलगावच्या बाजारात भाजीपाला कडाडला
By Admin | Updated: July 1, 2014 01:01 IST2014-07-01T00:06:30+5:302014-07-01T01:01:52+5:30
सादोळा: मान्सूनचा पाऊस लांबल्याचा परिणाम आता प्रत्येक गोष्टीवर जाणवू लागला आहे. माजलगावच्या बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने त्यांचे भाव कडाडले आहेत.

माजलगावच्या बाजारात भाजीपाला कडाडला
सादोळा: मान्सूनचा पाऊस लांबल्याचा परिणाम आता प्रत्येक गोष्टीवर जाणवू लागला आहे. माजलगावच्या बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने त्यांचे भाव कडाडले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री बसत आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या आहेत.
माजलगाव तालुका दोन धरणांच्या लाभक्षेत्रात येतो. मात्र अल्प पर्जन्याने दोन्ही धरणे कोरडी राहिल्याने सर्वत्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. विहिरी, बोअर आटल्याने भाजीपाल्याचे उत्पादनही घटले आहे. परिणामी या पाऊस नसल्यामुळे भाज्यांची आवकही कमी झाली आहे. आवक कमी झाल्याने बाजारात भाजीपाल्याचे भाव मोठ्या प्रमाणात कडाडले आहेत. भाव वाढल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला मात्र कात्री बसत आहे.
अकोला, हिंगोलीहून
कोथिंबिरीची आवक
माजलगावच्या आठवडी बाजारात येणारी कोथिंबीर ही अकोला आणि हिंगोली जिल्ह्यातून येत आहे. प्रत्येक आठवडी बाजारात तब्बल ५ ते १० क्विंटल कोथिंबीर या दोन जिल्ह्यातून येत आहे. भाजीपाल्याचे भाव वाढल्यामुळे ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे भाजी विक्रेते रामभाऊ धुमाळ यांनी सांगितले.
महागाईने जीव मेटाकुटीला आला असून, आता भाजीपाल्यानेही कहर केला आहे. यामुळे संसाराचा गाडा कसा चालवावा हाच प्रश्न पडला असल्याचे पूनम काळे, रंजना नाटकर या गृहिणींनी सांगितले. सध्या बाजारात मेथी १५ ते २० रु. जुडी, कोथिंबीर ५० ते ६० रु. जुडी, पालक १० ते २०, शेपू ३० ते ४०, सिमला मिरची १५० ते १८० रु. किलो, भोपळा १५० ते १६० रु. किलो, भेंडी ९० ते १०० रु. किलो भावाने विकत घ्यावी लागत आहे. या भाज्यांसह माजलगावच्या बाजारात इतर भाज्यांचे भाव १० ते २० टक्क्याने कडाडले आहेत. आता प्रत्येक शेतकऱ्याच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. (वार्ताहर)