भाजीपाला कडाडला..!
By Admin | Updated: April 18, 2016 00:51 IST2016-04-18T00:46:00+5:302016-04-18T00:51:48+5:30
जालना : जिल्ह्यात यंदा पडलेल्या अत्यल्प पावसामुळे जलसाठे मार्च महिन्यातच कोरडेठाक पडले होते. परिणामी भाजीपाला उत्पादनावर मोठा परिणाम झाला.

भाजीपाला कडाडला..!
जालना : जिल्ह्यात यंदा पडलेल्या अत्यल्प पावसामुळे जलसाठे मार्च महिन्यातच कोरडेठाक पडले होते. परिणामी भाजीपाला उत्पादनावर मोठा परिणाम झाला. उत्पादनात घट झाल्याने बाजारात आवक मंदावली असून, भावही कडाडले आहेत. भाज्यांच्या दारात पाच ते सात रूपयांनी वाढ झाली आहे.
जालना शहरात रविवारचा भाजीपाला बाजार भरतो.या बाजारात भाजीपाल्याची आवक गत पंधरवड्यापेक्षा अर्ध्याने कमी झाल्याचे चित्र दिसून आले. फळ तसेच पालेभाज्यांच्या भावात चांगलीच वाढ झाली होती.आठवडी बाजार भरत असल्याने अनेक नागरिक आठवडाभराचा भाजीपाला येथून खरेदी करतात. भावही बऱ्यापैकी असल्याने या बाजारातील गर्दी काही महिन्यांपासून वाढत आहे. १७ एप्रिल रोजी झालेल्या बाजारात भाज्यांचे भाव चांगलेच कडाडले होते. यात गवार ६० रूपये किलो, वांगे ३० रूपये किलो, सिमला मिरची ५० रूपये किलो, शेवगा शेंगा ४० रूपये किलो दराने विक्री झाली. बटाटे १५ ते ३० रूपये किलो, कांदा १० ते ३० रूपये किलोचे भाव आहेत. पाण्याची स्थिती बिकट असल्याने भाजीपाला उत्पादनावर परिणाम होत असल्याचे वाघ्रूळ येथील विक्रेते खरात यांनी सांगितले.मे महिन्यात परिस्थिती आणखी बिघडेल अशी भीती व्यक्त केली.
काही उत्पादक टँकरद्वारे पाणीपुरवठा देऊन उत्पादन घेत आहेत. पुढील महिन्यात टँकर कमी पडतील असा अंदाज खरात यांनी व्यक्त केला. जालना तालुक्यातील वाघ्रूळ, नंदापूर, जामवाडी, माळशेंद्रा इंदेवाडी, अंतरवाला, गोलापांगरी परिसरात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते.
या रविवारी वरील गावातून भाजीपाल्याची आवक कमालीची मंदावल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. पालक, मेथी, कोंथबीरेच भावही चांगलेच वधारले आहेत. कोथंबीरची जुडी दोन ते पाच रूपये, मेथी व पालक दहा रूपयांना तीन जुड्या मिळत होत्या. टोमॅटोचे भावह वीस रूपये प्रति किलोेंवर गेले आहेत.