खोदकामात सापडली तिजोरी अन् तलवारी

By Admin | Updated: September 4, 2014 01:24 IST2014-09-04T01:17:23+5:302014-09-04T01:24:16+5:30

ईट : मंदिराचे खोदकाम करताना एका तिजोरीसह चार तलवारी जमिनीतून मिळून आल्याचा प्रकार भूम तालुक्यातील गिरवली येथे बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आला.

The vault and the sword found in the kiosks | खोदकामात सापडली तिजोरी अन् तलवारी

खोदकामात सापडली तिजोरी अन् तलवारी


ईट : मंदिराचे खोदकाम करताना एका तिजोरीसह चार तलवारी जमिनीतून मिळून आल्याचा प्रकार भूम तालुक्यातील गिरवली येथे बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आला. यामुळे गिरवली व परिसरात हा चर्चेचा विषय बनला असून, या ठिकाणी आणखी काय आढळते, याचीही उत्सुकता लागली आहे.
याबाबत माहिती अशी की, गिरवली गावात मध्यवस्तीतील मुख्य चौकात विठ्ठल-रूक्मीणीचे मंदिर आहे. या मंदिरासमोर सोलाल चंपालाल ललवाणी यांची खुली पडीक जागा आहे. मूळ मारवाडी वंशजनांनी हीजागा ग्रामपंचायतीला दानपत्र करून दिलेली होती. याच जागेत गणपती मंदिराचे काम हाती घेण्यात आले आहे. बुधवारी महालक्ष्मीच्या मुहूर्तावर या मंदिराच्या पायाभरणी कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी एमएच१४/ एझेड ९१०६ या जेसीबी मशिनद्वारे पायाचे खोदकाम सुरू असताना दुपारी तीन वाजेच्या सुमारास जमिनीत मोठी लोखंडी पेटी आढळून आली. यानंतर ही पेटी बाहेर काढली असता ती सुमारे दोनशे किलो वजनाची तिजोरी असल्याचे दिसून आले. यापाठोपाठ याच ठिकाणी चार तलवारीही आढळून आल्या आहेत.
गिरवलीतील ही घटना पाहतापाहता तालुकाभर पसरली. त्यामुळे नेमके काय सापडले अन् कसे सापडले हे पाहण्यासाठी परिसरातील गावातून ग्रामस्थांनी गिरवलीत मोठी गर्दी केली होती. सापडलेल्या या वस्तू नेमक्या कोणत्या काळातल्या आहेत, त्या कुणी पुरून ठेवल्या असतील, अशी चर्चाही दुपारनंतर या परिसरात सर्वत्र ऐकावयास मिळत होती. मंदिराच्या खोदकामात आणखी काही सापडते काय, याचीही उत्सुकता सर्वांना लागली आहे. (वार्ताहर)
मंदिर खोदकामावेळी तलवारी व तिजोरी मिळून आल्याची माहिती कळताच महसूल विभागाचे नायब तहसीलदार चेतन पाटील, वाशीचे पोलिस निरीक्षक शहाजी शिंदे हेही गिरवलीत दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सापडलेले साहित्य पुढील चौकशीसाठी महसूल विभागाच्या ताब्यात घेतले. यावेळी मंडळ अधिकारी पी. टी. जाधव, गावकामगार तलाठी विकास देशपांडे, हरिभाऊ पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: The vault and the sword found in the kiosks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.