घाटनांदूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वाजले तीन तेरा

By Admin | Updated: June 23, 2014 00:20 IST2014-06-22T22:54:35+5:302014-06-23T00:20:59+5:30

घाटनांदूर : अंबाजोगाई तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून घाटनांदूरची ओळख आहे.

Vastanoor Primary Health Center at 3:00 pm | घाटनांदूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वाजले तीन तेरा

घाटनांदूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वाजले तीन तेरा

घाटनांदूर : अंबाजोगाई तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून घाटनांदूरची ओळख आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याची बदली झाल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे तीन तेरा वाजले आहेत. त्यामुळे सुमारे ३९ हजार लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे . अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडून पडली असून आरोग्याचे तीन तेरा वाजले आहेत. घाटनांदूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या उपकेंद्रांवर साळुंकवाडी, पूस, गिरवली, वरवटी, साकूड या ठिकाणी एकही आरोग्य कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. येथील उपकेंद्र दोन वर्षापासून बंद केले असून तब्बल एक वर्षापासून एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर आरोग्य केंद्राचा डोलारा सुरु आहे. तरीसुध्दा येथील वैद्यकीय अधिकाऱ्याची परळी येथील नागापूर येथे बदली झाल्याने डॉक्टराविनाच येथील आरोग्य केंद्र सुरु आहे. तब्बल २८ गावातील ४१ हजार जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे.
घाटनांदूर येथे १८ ते २० हजाराच्या जवळपास लोकसंख्या असून तब्बल १ वर्षापासून एका डॉक्टरवर चालणारे आरोग्य केंद्र, त्यांचीही १५ दिवसापूर्वीच बदली झाल्याने बेवारस आहे. साळुंकवाडी आरोग्य उपकेंद्रावर ए.एन.एम.चे एक पद रिक्त आहे. गिरवली उपकेंद्रावर एम. पी. डब्ल्यू. कर्मचाऱ्याचे एक पद रिक्त आहे. घाटनांदूर प्रा. आ. केंद्रात शिपाई जास्त आणि आरोग्य कर्मचारी कमी असा प्रकार आहे. या ठिकाणी पाच शिपाई, चार एम. पी. डब्ल्यू., पाच ए. एन. एम. व दोन सुपरवायझर असून एन.आर.एच.एम. योजनेंतर्गत कंत्राटी पध्दतीने दोन स्टाफ नर्स, चार ए.एन.एम., एक डाटा आॅपरेटर आदी कर्मचारी कार्यरत आहेत.
शासन आदेशानुसार प्रत्येक उपकेंद्रात प्रसुती होणे आवश्यक आहे. मात्र कर्मचारीच मुख्यालयी राहत नसल्याने प्रसुतीचा प्रश्नच येत नाही. घाटनांदूरच्या उपकेंद्रात रुग्ण आला की त्याला टोलवाटोलवीची उत्तरे देऊन अंबाजोगाईच्या स्वारातीत रेफर करण्यात येत असल्याचे प्रकार अनेक वेळा घडले आहेत. शासन नियमानुसार प्रत्येक पाच हजार लोकसंख्येला एक आरोग्य उपकेंद्र आवश्यक आहे. मात्र शासन स्वत:च आपले नियम धाब्यावर बसवत असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एस. साळुंके यांची एक वर्षापासून जागा रिक्त आहे तर दुसरे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एस. सोळंके यांची बदली झाल्याने हे पद रिक्त आहे. त्यामुळे येथील आरोग्य सेवा राम भरोसे असल्याचे दिसून आले आहे.
कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. येथील आरोग्य केंद्रात औषधसाठा पुरेसा उपलब्ध नसल्याने खासगी मेडिकल वरुन रुग्णांना औषधी विकत घ्यावी लागत आहेत. याचा आर्थिक भुर्दंड रुग्णांना सोसावा लागत आहे. येथे उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय स्थापन करावे अशी मागणी दहा वर्षापासून असतानाही याकडे लक्ष देण्यात आलेले नाही. अंबाजोगाईचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गायकवाड म्हणाले की, आमच्याकडे लेखी तक्रार नाही. तक्रार आल्यानंतर निश्चित कार्यवाही करु. ग्रामीण रुग्णालय येथे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. (वार्ताहर)

Web Title: Vastanoor Primary Health Center at 3:00 pm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.