वसमत- नांदेड रस्त्यावर चालकाचे हातपाय बांधून जीप पळविली
By Admin | Updated: July 8, 2014 00:37 IST2014-07-07T23:55:43+5:302014-07-08T00:37:32+5:30
वसमत: भाड्याने घेतलेल्या कारच्या चालकाचे हातपाय बांधून त्यास रस्त्याच्या बाजूला टाकून जीप घेऊन पसार झाल्याची घटना रविवारी मध्यरात्रीनंतर घडली.

वसमत- नांदेड रस्त्यावर चालकाचे हातपाय बांधून जीप पळविली
वसमत: भाड्याने घेतलेल्या कारच्या चालकाचे हातपाय बांधून त्यास रस्त्याच्या बाजूला टाकून जीप घेऊन पसार झाल्याची घटना रविवारी मध्यरात्रीनंतर घडली. वसमत-नांदेड महामार्गावरील माळवटा पाटीजवळ हा प्रकार घडला आहे.
नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील शेख फारूख यांची जीप क्र. एम. एच. २६ एन ५७८७ ही चार तरूणांनी रविवारी किरायाने घेतली. चालक आनंद लक्ष्मण चकटवार हा जीप चालवत होता. त्या तरूणांनी नांदेडहून परभणी असा प्रवास केला व परभणीहून परत येत असताना रात्री साडेबाराच्या सुमारास वसमत जवळील माळवटा पाटीजवळ गाडी थांबवली.
एक जण गाडीतून उतरून लघूशंकेसाठी गेला व तेथे जाऊन आरडाओरड सुरू केली. ते ऐकून गाडीतील अन्य तरूण व चालक गाडीतून उतरले व त्यावेळी चौघांनी चालकास मारहाण त्याच्या तोंडावर पट्टी बांधली. हातपाय बांधून डोळ्यात मिरचीची पूड टाकून ते तरूण कार घेऊन फरार झाले. चालक काही वेळाने सुटका करून रस्त्यावर आला असता त्यास वसमत पोलिसांचे गस्तीवर असलेले वाहन दिसले. घडलेला प्रकार चालकाने पोलिसांना सांगितला.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर प्रकरणी चालक आनंद चकटवार यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात ६ लाख ५० हजार रुपयांची कार चोरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.
या प्रकरणाची नोंद वसमत ग्रामीण पोलिसांनी घेऊन प्रकरण बिलोली पोलिसांकडे वर्ग केला असल्याची माहिती सपोनि सुनील नाईक यांनी दिली. (वार्ताहर)