वरुणराजा पुन्हा बरसला...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:43 IST2017-09-09T00:43:49+5:302017-09-09T00:43:49+5:30
आठवडाभरापूर्वीच अतिवृष्टी करून गेलेल्या वरुणराजाने शुक्रवारी पहाटे पुन्हा जोरदार हजेरी लावली

वरुणराजा पुन्हा बरसला...!
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : आठवडाभरापूर्वीच अतिवृष्टी करून गेलेल्या वरुणराजाने शुक्रवारी पहाटे पुन्हा जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाल्याने नदी-नाल्यांसह बंधारे तुडुंब भरले आहेत. बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो झाल्याने नदीला पूर आला होता. जिल्ह्यातील ७ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
दरम्यान, या पावसामुळे नदी-नाले, ओढे खळखळून वाहू लागले आहेत. तसेच बंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत. अनेक ठिकाणी लघु व मध्यम प्रकल्पांतील पाणी पातळी वाढली आहे. या पावसामुळे जलस्रोताची पाणीपातळी वाढणार असून, पिकांनाही दिलासा मिळणार आहे. काही अपवादात्मक नुकसान वगळता इतर ठिकाणी पावसाबद्दल समाधान व्यक्त होत आहे.
आष्टीत सर्वदुर हजेरी
आष्टी तालुक्यात सर्वदुर पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी सकाळपर्यंत पाऊस सुरूच होता. त्यानंतर पावसाने उघडीप दिली. या पावसामुळे शेतकरी समाधानी असून अनेकांचे हालही झाले.
तालखेडमध्येही जोरदार पाऊस
माजलगाव तालुक्यातील तालखेड पसिरातही जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे कापूस, तूर, बाजरी या पिकांना दिलासा मिळाला आहे. हा पाऊस रबी पेरणीसाठीही उपयोगाचा ठरणार आहे.