‘वरूण’माया, खरीप वाया
By Admin | Updated: August 6, 2015 00:09 IST2015-08-05T23:38:08+5:302015-08-06T00:09:24+5:30
बीड : तब्बल दिड महिन्याच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात मंगळवारपासून पाऊस सक्रीय झाला. या पावसाचा करपलेल्या पिकांना फायदा नसला तरी गायब झालेला पाऊस पुन्हा

‘वरूण’माया, खरीप वाया
बीड : तब्बल दिड महिन्याच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात मंगळवारपासून पाऊस सक्रीय झाला. या पावसाचा करपलेल्या पिकांना फायदा नसला तरी गायब झालेला पाऊस पुन्हा सक्रीय झाल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. मंगळवारी दुपारनंतर सुरू झालेला रिमझिम पाऊस बुधवारी दिवसभर जिल्ह्यात सुरू होता. वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ १४.७५ मि. मी. पर्जन्यमान झाले आहे.
मागील दोन महिन्यात पावसाने दडी मारली असल्याने शेतकरी चिंताक्रांत झाले होते. मात्र मंगळवारी दुपारी १२ नंतर रिमझिम पाऊस सुरू झाला. बुधवारी दिवसभर रिमझिम सुरू राहिल्याने वातावरण आनंदी झाले होते. सुरू असलेल्या रिमझिम पावसाने तात्काळ बोअर, विहिरींना पाणी येणे शक्य नसले तरी या रिमझिम पावसाचा जोर वाढत गेला तर पुढील एक महिन्यात जनावरांसाठी चारा उपलब्ध होऊ शकेल. यामुळे शेतकरी वर्गामधून समाधान व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)
बीड : दीड महिन्याच्या उघडीनंतर पावसाचे पुनरागमन झाले असले तरी खरीप हंगामातील बाजरी व तूर या पिकांना मोठा फायदा होणार आहे.
खरीपातील कापूस व सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीनचे ५० टक्के तर कापूस ३० टक्के जळून खाक झाला आहे. ते नुकसान भरून निघणे मुश्किल आहे. खरीपातील या मुख्य पिकांनाच फटका बसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील खरीपातील पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी या रिमझिमुळे बाजरी, तूर, तीळ या पिकांची दुबार पेरणी होऊ शकत असल्याचे कृषितज्ज्ञ रामेश्वर चांडक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
खरीपातील पिकांचे नुकसान झाले असले तरी पावसाच्या पुनरागमनाने शेतकरी समाधानी आहे. किमान चाराटंचाई व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मिटणार आहे. (प्रतिनिधी)
मंगळवारी झालेल्या पावसामध्ये माजलगाव तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच २०.८ मि. मी. पावसाची नोंद झाली तर सर्वात कमी आष्टी तालुक्यात ३.६ मि. मी. पावसाची नोंद झाली. आष्टीसह शिरूर कासार, पाटोदा, गेवराई तालुक्यात सर्वात जास्त दुष्काळी परिस्थिती असल्याने पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात आहे.