‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ ला उदंड प्रतिसाद
By Admin | Updated: July 16, 2014 00:49 IST2014-07-16T00:24:14+5:302014-07-16T00:49:24+5:30
हिंगोली : जीवंत अभिनय, खुमासदार विनोद, लक्षवेधी वेशभूषा, आणि उत्तम नाट्याविष्काराचा अनुभव ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या नाटकातून सखीमंच आणि बालविकास मंचच्या सदस्यांनी घेतला.
‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ ला उदंड प्रतिसाद
हिंगोली : जीवंत अभिनय, खुमासदार विनोद, लक्षवेधी वेशभूषा, आणि उत्तम नाट्याविष्काराचा अनुभव ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या नाटकातून सखीमंच आणि बालविकास मंचच्या सदस्यांनी घेतला. अर्थात नाटक एकपात्री असताना देखील अडीच तास प्रेक्षकांना खिळवून ठेवत सखींसह बालकांच्या टाळ्या कलाकार संदीप पाठक यांनी मिळविल्या. अनुक्रमे वसमत आणि हिंगोली शहरात सादर झालेल्या या नाट्य प्रयोगाला झालेल्या गर्दीने भरभरून प्रतिसाद दिला.
प्रा. लक्ष्मणराव देशपांडे लिखित ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या नाटकाच्या हजारो प्रयोगानंतरही प्रेक्षकांची मागणी कायम असलेने या नाटकाचा प्रयोग ‘लोकमत’ सखीमंच व बालविकास मंचच्या सदस्यांसाठी हिंगोली व वसमत शहरात घेण्यात आला. हिंगोली शहरातील कल्याण मंडप्ममध्ये १२ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजता झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुण्या म्हणून लीना चव्हाण, गजेंद्र बियाणी, जेट किड्स इंटरनॅशनल स्कुलचे उमाकांत देशमुख, मोनाली देशमुख, युवराज फॅशन ज्वेलर्सचे केशव शांकट, लता शांकट आदींची उपस्थिती होती. सखी व बालमंचच्या सदस्यांसाठी घेतलेल्या नाटकातील कलाकार संदीप पाठक यांनी उपस्थितींची मने जिंकली. अडीच तासांच्या या नाटकात तब्बल ५२ भूमिका वटवित पाठक यांचा अत्यंत भावपूर्ण अभिनय उपस्थितांना पहावयास मिळाला. नाटकात उत्कृष्ट वेशभूषा, लक्षवेधी केशरचनेसह काही पात्रांच्या ह्रदयस्पर्शी अभियनयाशी संगम साधत सादर केलेल्या डायलॉगने सदस्यांना निखळ आनंद दिला. शिवाय प्रत्येक पात्राला योग्य न्याय देत पाठक यांनी अधून-मधून सादर केलेल्या खुमासदार विनोदाने बालकांना आणि सखींना खळखळून हसविले. दरम्यान पाठक यांनी रेल्वे, विमानाचा आवाज काढून सर्वांच्या टाळ्या मिळविल्या. अडीच तास रंगलेल्या या प्रयोगाने चांगलेच मनोरंजन झाल्याची प्रतिक्रिया अनेक महिलांनी दिली. सूत्रसंचालन सुप्रिया पतंगे यांनी केले. जेट किड्स इंटरनॅशनल स्कुल व युवराज फॅशन ज्वेलर्सने या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व स्वीकारले होते.
वसमत येथील सदस्यांचेही जिंकली मने
वसमत येथील व्यंकटेश्वरा मंगल कार्यालयात ११ जुलै रोजी हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन सम्राट कलेक्शनचे रियाज कुरेशी, काफिया परविन यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक राजेश पवार, निशिगंधा कोतवाल यांनी उपस्थिती होती. येथील प्रयोगाला देखील महिलानी भरभरून दाद दिली. कलाकार पाठक यांच्या अभिनयाने सखीमंचच्या सदस्यांची मने जिंकली. सुत्रसंचालन उज्वला तोळमारे यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व सम्राट कलेक्शनने स्वीकारले होते. (प्रतिनिधी)