जलकुंभाखाली वॉल्व्हची गळती

By Admin | Updated: August 3, 2014 00:58 IST2014-08-03T00:23:00+5:302014-08-03T00:58:59+5:30

मानवत : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभाखालच्या वॉल्व्हची गळती झाली आहे. या गळतीने टाकीतील अंदाजे चार लाख लिटर पाण्याची नासाडी झाली.

Valve's leakage under hyacinth | जलकुंभाखाली वॉल्व्हची गळती

जलकुंभाखाली वॉल्व्हची गळती

मानवत : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभाखालच्या वॉल्व्हची गळती झाली आहे. या गळतीने टाकीतील अंदाजे चार लाख लिटर पाण्याची नासाडी झाली. कर्मचाऱ्यांच्या गाफीलपणामुळे हा प्रकार २ आॅगस्टच्या पहाटे अडीच्या सुमारास घडला.
मानवतला पाणीपुरवठा करणारा जलशुद्धीकरण प्रकल्पावरील जलकुंभ ११ लक्ष लिटरचा आहे. हा जलकुंभ शहरात असणाऱ्या सर्वच जलकुंभापेक्षा उंचीवर आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण प्रकल्पातून शुद्ध झालेले पाणी याच जलकुंभामध्ये साठविल्या जाते आणि त्यानंतर शहरातील इतर जलकुंभामध्ये वितरित करण्यात येते. १ आॅगस्ट रोजी जलशुद्धीकरण प्रकल्पातून शुद्ध झालेले पाणी जलशुद्धीकरण प्रकल्पातील जलकुंभामध्ये साठविण्यात आले. हे पाणी जलकुंभामध्ये सहा मीटर म्हणजे सुमारे ८ लक्ष लिटर एवढे होते. जलकुंंभाखालच्या वॉल्व्हमधून सातत्याने पाणी गळती होत असल्याने नगराध्यक्षांनी जलकुंभाच्या खाली १ आॅगस्ट रोजी १ लाख १२ हजार ५०० रुपयांचा नवीन वॉल्व्ह टाकला. परंतु याची फिटिंग योग्य प्रकारे झाली नाही.
न.प.च्या पाणीपुरवठा विभागाने या वॉल्व्हची खरे तर जलकुंभात पाणी साठवित असताना चाचणी घेणे गरजेचे होते. परंतु अशी कोणतीही चाचणी पाणीपुरवठा विभागाने घेतली नाही. परिणामी जलकुंभात ८ लक्ष पाणी साठल्यानंतर पाण्याचा दाब वॉलवर पडला आणि नव्यानेच बसविण्यात आलेल्या वॉल्व्हमधून पाईप एक इंच बाजूला सरकला. परिणामी पाणी मोठ्या प्रमाणावर गळती झाले. परंतु याचा अंदाज गाफील कर्मचाऱ्यांना येईपर्यंत सुमारे ४ लाख लिटरपेक्षा अधिक पाणी वाहून गेले होते.
जलकुंभावरील कर्मचाऱ्यांना जाग आल्यानंतर उर्वरित पाणी आठवडी बाजारातील जलकुंभात साठविण्यासाठी सोडले. परंतु तोपर्यंत बराच उशीर झाला होता. मानवतला पाणीपुरवठा करण्यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्पावरील जलकुंभ भरण्यासाठी ९ तासाचा अवधी लागतो. सदरील जलकुंभ साधारणपणे ७५ टक्के भरलेला असताना गळतीमुळे रिकामा झाला आणि नागरिकांची तहानही भागली नाही. नागरिक मात्र आपल्याला पाणी येणार, या आशेने नळाकडे पाहतच राहिले. जलकुंभातील पाणी गळती झाल्यानंतर उपनगराध्यक्ष बाबूराव हळनोर, डॉ. अंकुश लाड व इतर नगरसेवकांनी येऊन वॉल्व्हची पाहणी केली आणि तत्काळ वॉल्व्हची दुरुस्ती करून जलकुंभाचे पुनर्रभरण चालू केले.
नवीन टाकलेल्या वॉल्व्हची पाणीपुरवठा विभागाने चाचणी घेतली नाही आणि त्याचा परिणाम मात्र शहरवासियांना पाण्याच्या भटकंतीने सहन करावा लागला. (वार्ताहर)
पाण्याचा साचला डोह
जलकुंभातील पाणी गळती झाल्यानंतर त्याचा वेग एवढा होता की, जलकुंभाच्या बाजूला असणारी माती चक्क वाहून जाऊन तिचा आकार नालीसारखा झाला. तर शासकीय मुलांच्या वसतिगृहाकडे मोठमोठे असणारे खड्डे या पाण्यामुळे तुडुंब भरून जाऊन या परिसराला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. या ठिकाणाहून शासकीय वसतीगृहातील मुले शहरातील शाळा, महाविद्यालयात ये-जा करतात. त्यांचा रस्ता या पाण्यामुळे बंद झालाच शिवाय दिवसा म्हशींंनीही या पाण्यात शिरून स्नाचा आनंद घेतला. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही काळापर्यंत मिटला आहे.

Web Title: Valve's leakage under hyacinth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.