गावपातळीवर शैक्षणिक गुणवत्तेचे मुल्यमापन
By Admin | Updated: February 11, 2015 00:27 IST2015-02-11T00:23:57+5:302015-02-11T00:27:01+5:30
राहुल ओमणे , शिराढोण बाजारपेठेचं गाव म्हणून शिराढोणची ओळख आहे. येथे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक सुविधाही उपलब्ध आहेत. मात्र त्यानंतरही गावातील अनेक पालक आपल्या पाल्यांना

गावपातळीवर शैक्षणिक गुणवत्तेचे मुल्यमापन
राहुल ओमणे , शिराढोण
बाजारपेठेचं गाव म्हणून शिराढोणची ओळख आहे. येथे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक सुविधाही उपलब्ध आहेत. मात्र त्यानंतरही गावातील अनेक पालक आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी शेजारच्या मुरुडसह इतर गावात पाठवित असल्याचे पुढे आल्यानंतर मुरुडमधील शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी ग्रामस्थांनीच पुढाकार घेतला आहे. या उपक्रमांतर्गत ग्रामपातळीवर मंगळवारी पहिल्यांदाच लेखी परीक्षाही घेण्यात आली.
शिराढोण येथे शैक्षणिक संस्थांची संख्याही लक्षणीय आहे. येथे जिल्हा परिषदेच्या दोन स्वतंत्र प्राथमिक आणि एक माध्यमिक अशा तीन शाळा असून, अनुदानित संस्थांच्याही एक प्राथमिक आणि दोन माध्यमिक अशा शिराढोणमध्ये एकूण ६ शाळा आहेत. मात्र त्यानंतरही शिराढोणमधील अनेकजण आपल्या मुलांना शिक्षणासाठी शेजारच्या गावात पाठवित होते. ही बाब येथील तरुणांसह काही सुज्ञ पालकांच्या निदर्शनास आल्यानंतर गावातील शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असा विचार पुढे आला. आणि त्याअनुषंगाने ग्रामस्थांच्या सहभागातून प्रयत्न सुरु झाले. याचाच भाग म्हणून एकत्रित आलेल्या या तरुणांनी गावातील सर्व शाळांमधील ४ थी, ७ वी व १० वी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रातिनिधीक स्वरुपात लेखी परीक्षा घेवून ग्रामपातळीवरच शाळेचे मुल्यांकन करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार जिल्हा परिषद केंद्रीय कन्या प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रणजित पाटील यांनी गावातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची भेट घेवून ग्रामपातळीवर विद्यार्थ्यांची परीक्षा घेवून गुणवत्तेचे मुल्यमापन करण्याची संकल्पना मांडली. तसेच याबाबत लेखी पत्रही दिले. या उपक्रमासाठी गावातीलच पदवी, पदविका संपादन केलेल्या तरुण, तरुणींचे सहकार्य घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सुशिक्षीत तरुणांनी प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून परीक्षा पार पाडेपर्यंत महत्वाची भूमिका बजावावी, असे ठरले. मंगळवारी सकाळी ९ ते १२ या वेळेत इयत्ता ७ वी व दहावीच्या विद्यार्थ्यांची इंग्रजी व गणित विषयाची तर इयत्ता ४ थीमधील विद्यार्थ्यांची सर्व विषयावर आधारीत लेखी परीक्षा घेण्यात आली.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी रणजित पाटील यांच्यासह उमा पाटील, साधना पवार, शैलेश पाटील, लक्ष्मण नथाडे, दयानंद राऊत, अमोल माकोडे, खंडू वाघमारे, राजकुमार कुंभार, हणमंत ठोंबरे, राम सहाणे, दयानंद खडबडे आदी शिक्षणशास्त्राचे शिक्षण घेतलेल्या तरुणांनी परिश्रम घेतले. ग्रामस्थांनी राबविलेला हा उपक्रम अतिशय प्रेरणादायी असून, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची सर्वांगिण गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार असल्याचे सावित्रीबाई कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मिना ठाकूर यांनी सांगितले. तर गावातील शाळांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्याची जबाबदारी केवळ शाळा आणि शिक्षक यांच्यावरच न सोपविता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी अशा उपक्रमात पालकांनीही सहभाग घ्यावा, असे मत उमाकांत व्यवहारे यांनी व्यक्त केले. दरम्यान, या परीक्षेमध्ये ३०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.