वाल्मीच्या संचालकांकडे कोटींचे घबाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 05:19 IST2017-12-31T05:19:08+5:302017-12-31T05:19:18+5:30
प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई न करण्यासाठी त्यांच्याकडून दहा लाखांची लाच घेतल्याप्रकरणी रंगेहाथ पकडलेले जल आणि भूमी व्यवस्थापन संस्थेचे (वाल्मी) महासंचालक हरिभाऊ गोसावी आणि सहसंचालक राजेंद्र क्षीरसागर यांचे पुण्यातील उच्चभू्र वसाहतीत कोट्यवधी रुपये किमतीचे बंगले आणि बँकांमध्ये लॉकर असल्याचे समोर आले.

वाल्मीच्या संचालकांकडे कोटींचे घबाड
औरंगाबाद : प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई न करण्यासाठी त्यांच्याकडून दहा लाखांची लाच घेतल्याप्रकरणी रंगेहाथ पकडलेले जल आणि भूमी व्यवस्थापन संस्थेचे (वाल्मी) महासंचालक हरिभाऊ गोसावी आणि सहसंचालक राजेंद्र क्षीरसागर यांचे पुण्यातील उच्चभू्र वसाहतीत कोट्यवधी रुपये किमतीचे बंगले आणि बँकांमध्ये लॉकर असल्याचे समोर आले.
गोसावी यांचे पुण्यातील शिवाजीनगर येथे तर क्षीरसागर यांचा सिंहगड सिटीमध्ये आलिशान बंगला असल्याचे चौकशीत समोर आले. या बंगल्यांची किंमत कोट्यवधी रुपये आहे. शिवाय उभयतांची पुणे येथील बँकांमध्ये लॉकर आहेत. त्याची तपासणी केली जाणार आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक वर्षाराणी पाटील यांनी सांगितले की, वाल्मीचे महासंचालक आणि जलसंधारण आयुक्तालयाचे आयुक्त अशी दोन पदे गोसावी सांभाळत होते. क्षीरसागर हे अधीक्षक अभियंता दर्जाचे अधिकारी असून, ते सहसंचालकपदी कार्यरत आहेत.
गोसावी यांच्या बंगल्यात सध्या कोणीही नसल्याने तेथे पोलीस गार्ड लावण्यात आला, तर क्षीरसागरच्या बंगल्याची झडती एसीबीचे अधिकारी घेणार आहेत. गोसावी बंगल्यांची नंतर झडती होणार आहे़
अधिका-याचे नांदेडला घर
शेतक-याकडे ५० हजार रुपये लाचेची मागणी करून स्वीय सहायकामार्फत दहा हजार रुपये लाच घेतल्याप्रकरणी पकडण्यात आलेले सिल्लोडचे उपविभागीय अधिकारी अनिल माचेवाड यांच्या नांदेड येथील घराची झडती घेण्यासाठी त्यास सोबत घेऊन पोलीस नांदेडला गेले आहेत.