घाटीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांची पालकमंत्र्यांकडे धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:27 IST2020-12-17T04:27:02+5:302020-12-17T04:27:02+5:30
औरंगाबाद : थकीत वेतन, बोनस आणि किमान वेतनाच्या मागणीसाठी गेल्या ३० दिवसांपासून साखळी उपोषण करणाऱ्या घाटीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी ...

घाटीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांची पालकमंत्र्यांकडे धाव
औरंगाबाद : थकीत वेतन, बोनस आणि किमान वेतनाच्या मागणीसाठी गेल्या ३० दिवसांपासून साखळी उपोषण करणाऱ्या घाटीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली. या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे आश्वासन सुभाष देसाई यांनी दिले.
उपोषणास बसलेल्या सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्या सोडवाव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस कॉम्रेड ॲड. अभय टाकसाळ यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सुभाष देसाई यांची भेट घेऊन निवेदन दिले. सुभाष देसाई यांनी सदरील प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊन चौकशी केली जाईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळात महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेचे सहसचिव किरणराज पंडित, गजानन खंदारे, विकास गायकवाड, महेंद्र मिसाळ आदींचा समावेश होता.
मुख्य मालक म्हणून वेतन द्या
कंत्राटदाराने वेळेवर पगार न दिल्यास थकलेले वेतन देण्याची जबाबदारी ही मुख्य मालकाची आहे. त्यामुळे मुख्य मालक म्हणून आपण कामगारांना वेतन दिले पाहिजे, असे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांना सहायक कामगार आयुक्तांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. यासंदर्भात तोडगा काढून थकीत वेतन देण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे डॉ. येळीकर यांनी सांगितले.
फोटोओळ..
घाटीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसदर्भात पालकमंत्री सुभाष देसाई यांना निवेदन देण्यात आले.