विष्णूपुरी प्रकल्पात ११ दलघमी पाणी
By Admin | Updated: August 8, 2014 00:33 IST2014-08-08T00:27:11+5:302014-08-08T00:33:42+5:30
नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पात पाण्याची आवक होत नसल्यामुळे गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे़

विष्णूपुरी प्रकल्पात ११ दलघमी पाणी
नांदेड : अर्धापावसाळा संपला तरी विष्णूपुरी प्रकल्पात अद्याप वरील भागातून पाण्याची आवक होत नसल्यामुळे पुढील काळात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे़ प्रकल्पात सध्या ११ दलघमी पाणीसाठा असून हे पाणी अवघे तीन महिने पुरेल एवढेच आहे़
मराठवाड्यावर कोरड्या दुष्काळाचे गडद सावट निर्माण झाले आहे़ पाच नक्षत्र संपले असून सहावे आश्लेषा नक्षत्र सुरू आहे़ या सर्व नक्षत्रात समाधानकारक पाऊस न बरसल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ पावसाअभावी मराठवाड्यातील प्रमुख धरणांची स्थिती चिंताजनक आहे़ विष्णूपुरी प्रकल्पात सध्या ११़४६ दलघमी साठा उपलब्ध असून हे पाणी नांदेडकरांना पुढील अडीच, तीन महिने पुरेल एवढेच आहे़
येणाऱ्या नक्षत्रात पावसाने साथ न दिल्यास दिवाळीपासून पिण्याच्या पाण्याचे संकट उभे राहणार आहे़ येणाऱ्या मघा, पूर्वा, हस्त या तीन नक्षत्रावरच आता मदार आहे़ १६ आॅगस्टपासून मघा या नक्षत्राला प्रारंभ होणार आहे़ मघा नक्षत्रात जोरदार पाऊस पडण्याची प्रतीक्षा आहे़ मात्र या नक्षत्रांनी हुलकावणी दिल्यास येणाऱ्या काळात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे़
मागील दोन वर्षापासून अल्पपावसामुळे विष्णूपुरी प्रकल्पातील उपलब्ध असलेल्या पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे़ ऐन पावसाळ्यात तीन दिवसाआड पाणी सोडावे लागत आहे़ शहराला दोन दिवसाआड २५ क्युसेस पाणी सोडले जाते़ त्यामुळे पाण्याचा वापर नागरिकांना जपून करावा लागणार आहे़ विष्णूपुरी प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाल्याने मागील महिन्यात दिग्रस बंधाऱ्यातून १० दलघमी पाणी सोडण्यात आले़ त्यामुळे विष्णूपुरी प्रकल्पातील साठा वाढला आहे़
जिल्ह्यात आतापर्यंत साधारणपणे १२० मि़ मी़ पाऊस झाला आहे़ जिल्ह्यातील नद्या, नाले, तलाव कोरडेच दिसत आहेत़
येणाऱ्या काळातील पाण्याचे संकट ओळखून नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करण्याची वेळ आली आहे़ महापालिकेला शहरात अनावश्यक पाणी वापरावर निर्बंध घालून पिण्याच्या पाण्यासाठी प्रकल्पातील साठा राखीव ठेवावा लागणार आहे़
(प्रतिनिधी)