वैद्यनाथ बँक विजयाचा आगामी निवडणुकांमध्ये होणार लाभ

By Admin | Updated: June 23, 2016 00:11 IST2016-06-23T00:11:56+5:302016-06-23T00:11:56+5:30

शिरीष शिंदे , बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेत शेतकऱ्यांनी भरलेला ८९२ कोटींचा पीक विमा मंजूर करवून आणल्याचे सांगत ग्राम विकास मंत्री तथा पालकमंत्री

Vaidyanath Bank will win the next election | वैद्यनाथ बँक विजयाचा आगामी निवडणुकांमध्ये होणार लाभ

वैद्यनाथ बँक विजयाचा आगामी निवडणुकांमध्ये होणार लाभ


शिरीष शिंदे , बीड
जिल्हा मध्यवर्ती बँकेत शेतकऱ्यांनी भरलेला ८९२ कोटींचा पीक विमा मंजूर करवून आणल्याचे सांगत ग्राम विकास मंत्री तथा पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी वैद्यनाथ बँक निवडणूक प्रचारात आघाडी घेतली. आपणच बँक व्यवस्थीत चालवू शकतो, हा संदेश त्यांनी या माध्यमातून दिला. हा मुद्दा प्रभावी ठरल्याने सभासदांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे जनसेवा पॅनलला मतदान करत सर्वच्या सर्व जागा त्यांच्या ताब्यात दिल्या तर विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे पुरस्कृत वैद्यनाथ विकास पॅनलला एकही जागा मिळविता आली नाही.
जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील सर्व बँकामध्ये वैद्यनाथ बँकेची एक वेगळीच ओळख असून सभासदांच्या अग्रस्थानी आहे. सध्या या बँकेची साडेतेराशे कोटींची वार्षीक उलाढाल आहे. लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात ४१ शाखांचा विस्तार झाला होता. त्यामुळे त्यांचे अनेक वर्षे वैद्यनाथ बँकेवर वर्चस्व होते. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच बँकेसाठीची निवडणूक होत असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष याकडे लागले होते. वैद्यनाथ बँक निवडणुकीत पंकजा मुंडे पुरस्कृत लोकनेते गोपीनाथ मुंडे जनसेवा पॅनलचे १७ तर विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे पुरस्कृत वैद्यनाथ विकास पॅनलचे १७ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात होते. ही निवडणूक कोण जिंकते, कोण बँकेवर ताबा मिळवितो याची उत्सुकता मंगळवारी रात्रीपर्यंत कायम होती.
दरम्यान, पहिल्या ते अखेरच्या पाचव्या फेरीपर्यंत पंकजा मुंडे यांचा लोकसेवा पॅनल कायम आघाडीवरच होता. जनसेवा पॅनलने सरासरी दहा हजार मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळविला. या निवडणुकीत उमेदवार असलेल्या खा.डॉ. प्रीतम मुंडे यांनी सर्वाधिक १३ हजार ३६७ मते मिळवली. खा.डॉ. प्रीतम मुंडे यांनीही निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतली होती. त्याचे फळ मतदानाच्या रुपातून समोर आले. जनसेवा पॅनल सुरुवातीपासून आघाडीवर असल्याने फेरीगणीक कार्यकर्त्यांच्या उत्साह वाढतच होता. तिसऱ्या फेरीनंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळीत विजयाचा जल्लोष साजरा केला. संधीसाधू लोकांना मतदारांनी या निमित्ताने धडा शिकवला, अशी प्रतिक्रीया भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी दिली.
परळी आणि परिसरामध्ये वैद्यनाथ बँकेची पाळेमुळे रुजलेली असून या विजयामुळे पालकमंत्री पंकजा मुंडे यांना बँकेच्या माध्यमातून चांगली प्रतिमा बनवून आगामी जिल्हा परिषद व नगर पालिका निवडणुकीत लाभ होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

Web Title: Vaidyanath Bank will win the next election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.