औरंगाबादेतही लसीकरणाचा १ मे रोजीचा मुहूर्त हुकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:02 IST2021-04-30T04:02:02+5:302021-04-30T04:02:02+5:30
औरंगाबाद : देशभरात १ मेपासून १८ ते ४४ वयोगटांतील व्यक्तींच्या लसीकरणास सुरुवात होणार असल्याची घोषणा सरकारने केली ...

औरंगाबादेतही लसीकरणाचा १ मे रोजीचा मुहूर्त हुकणार
औरंगाबाद : देशभरात १ मेपासून १८ ते ४४ वयोगटांतील व्यक्तींच्या लसीकरणास सुरुवात होणार असल्याची घोषणा सरकारने केली आहे. प्रत्यक्षात या वयोगटातील लोकांसाठी जिल्ह्याला लसी मिळालेल्या नाही, पण त्याबरोबरच आता लसीचे स्टोअरही रिकामे झाले आहे. सध्या सुरू असलेले लसीकरणही थांबण्याची वेळ ओढावत आहे. त्यामुळे औरंगाबादेतही लसीकरणाचा १ मे रोजीचा मुहूर्त हुकण्याची स्थिती आहे.
जिल्ह्यातील केंद्रांवर फक्त ३ हजार डोस उपलब्ध आहे. सध्या ४५ वर्षांवरील व्यक्तींना लस दिली जात आहे. देशात १८ वर्षांवरील तरुणांचे १ मेपासून लसीकरण सुरू होणार आहे. लस घेण्यासाठी १८ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणीला बुधवारपासून सुरुवात होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. प्रत्यक्षात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला या नोंदणीसह १ मेपासून होणाऱ्या लसीकरणाविषयी काहीही माहिती नसल्याची स्थिती आहे.
या वयोगटासाठी लस आल्या, तरच लसीकरण, अशी परिस्थिती आहे. कारण लसींचा पुरवठाच होत नाही. आरोग्य उपसंचालक कार्यालयाने लसींची मागणी केली आहे. आगामी दोन दिवसांत लस मिळाल्या, तर लसीकरण सुरळीत होण्याची चिन्हे आहेत.
लसींचा पुरवठा लागेल
१ मेपासून लसीकरण सुरू होईल की नाही, हे सांगता येणार नाही. १८ ते ४४ वयोगटांतील व्यक्तींच्या लसीकरणासाठी लस लागतील. स्टोअरमध्ये लस उपलब्ध नाही, परंतु फिल्डवर ३ हजार डोस उपलब्ध आहे. यातून दोन दिवस लसीकरण होईल.
-डाॅ.विजयकुमार वाघ, जिल्हा लसीकरण अधिकारी