रिक्त पदांचा रुग्णसेवेला फटका
By Admin | Updated: September 4, 2014 00:55 IST2014-09-04T00:41:43+5:302014-09-04T00:55:09+5:30
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील (घाटी) वैद्यकीय शिक्षक, विविध प्रकारचे तंत्रज्ञ, कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी ते चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत.

रिक्त पदांचा रुग्णसेवेला फटका
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील (घाटी) वैद्यकीय शिक्षक, विविध प्रकारचे तंत्रज्ञ, कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी ते चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यास टाळाटाळ होत असल्याने कार्यरत असलेल्या विद्यमान कर्मचाऱ्यांना कामाचा अतिरिक्त बोजा सहन करावा लागत असून त्याचा फटका रुग्णसेवेला बसत असल्याचे दिसून येते.
घाटी रुग्णालयात वैद्यकीय शिक्षकांची २६ पदे मंजूर आहेत. यापैैकी ११ पदे भरण्यात आलेली असून, १५ पदे रिक्त आहेत. यात प्राध्यापकांची तीन, सहयोगी प्राध्यापकांची १० आणि इतर वर्ग १ अधिकाऱ्यांच्या २ पदांचा समावेश आहे. याशिवाय सहायक प्राध्यापकांची १७ पदे मंजूर असून ३ पदे रिक्त असल्याची माहिती मिळाली आहे. वर्ग दोन अधिकाऱ्यांची ३१ पदे मंजूर असून, ३ पदे रिक्त असल्याचे घाटी प्रशासनाच्या सूत्राने सांगितले. हाऊस आॅफिसर आणि निवासी डॉक्टरांची ५१ पदे मंजूर आहेत. त्यापैैकी १८ पदे रिक्त आहेत. शिवाय वर्ग ३ चे कर्मचारी असलेल्या लिपिकवर्गीय आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांचाही घाटीत तुटवडा सुरू आहे. विविध विभागातील तांत्रिक कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर रिक्त होणारे पद तातडीने भरणे आवश्यक असते. तसे न झाल्याने तांत्रिक कर्मचाऱ्यांचा रिक्त पदांचा आकडा वाढतच आहे. घाटीत तांत्रिक कर्र्मचाऱ्यांची ११६ पदे मंजूर आहेत. त्यापैैकी ३७ पदे रिक्त आहेत, तर लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांची ७ पदे अनेक वर्षांपासून भरण्यात आलेली नाहीत. परिचर्या संवर्गाची ३१ पदे असून ८ पदे रिक्त आहेत.