रिकाम्या बसेस सुसाट !
By Admin | Updated: July 28, 2014 00:55 IST2014-07-27T23:51:22+5:302014-07-28T00:55:15+5:30
चाकूर : एकीकडे महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळ तोट्यात असल्याचा बोभाट केला जात असताना दुसरीकडे मात्र चालक- वाहकांची मनमानी होत असल्याचे पहावयास मिळत आहे़
रिकाम्या बसेस सुसाट !
चाकूर : एकीकडे महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळ तोट्यात असल्याचा बोभाट केला जात असताना दुसरीकडे मात्र चालक- वाहकांची मनमानी होत असल्याचे पहावयास मिळत आहे़ अधिकृत थांब्यावरही बसेस थांबत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे़ परिणामी प्रवाशांना अवैध वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे़
बहुजन हिताय, बहुजन सुखाय असे ब्रिदवाक्य घेऊन प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या महाराष्ट्र राज्य एस़टी़ महामंडळातील काही कर्मचाऱ्यांच्या असहकार धोरणामुळे प्रवाशांचे हाल होत आहे़त़ तालुक्यातील चापोली, लातूररोड, घरणी-आष्टा-महाळंग्रा ही राज्य मार्गालगतची गावे आहेत़ एस़टी़चा सुखाचा प्रवास म्हणून प्रवासी बसला जास्त प्राधान्य देतात़ एस़टी़चे ग्रामीण भागातील जाळे दिवसेंदिवस कमी होत चालले आहे़
बसेसमध्ये प्रवासी जास्त असले की, डबल बेल देऊन एस़टी़बस थांब्याच्या पुढे अथवा मागे उभी केली जाते़ अनेकदा प्रवासी बसथांब्यावर थांबवा म्हणून वाहक-चालकांशी वाद घालतात़ परंतु, त्याचा काहीच परिणाम होत नाही़ चापोली येथे बसेस थांबत नसल्याने येथून हिंपळनेर, आनंदवाडी, अजनसोंडा, शंकरवाडी, उमरगा कोर्ट, हणमंत जवळगा या भागातून ये- जा करणाऱ्या प्रवाशांची तारंबळ उडते आहे़ याप्रमाणेच परिस्थिती लातूररोड, घरणी, महाळंग्रा येथेही आहे़
त्यामुळे अनेक प्रवासी नाईलाजास्तव अवैध वाहतुकीचा आधार घेत आहेत़ अनेकदा अवैध वाहनांवर लोंबकळत राहून प्रवास करावा लागतो़ बसेस अधिकृत थांब्यावर थांबू लागल्या तर प्रवाशांची गैरसोय दूर होईल तसेच महामंडळाचे उत्पन्नही वाढेल़ चाकूर तहसीलसमोर बस थांबा आहे़ जवळच न्यायालय आहे़ त्याशेजारी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र असून, समोरच्या बाजूस औद्योगिक वसाहत आहे़ येथे विनंती थांबा देण्यात आला़ या ठिकाणी दररोज अनेक प्रवासी, विद्यार्थी थांबतात़ परंतु, बऱ्याच बसेस येथे थांबत नसल्याने नाईलाजास्तव प्रवाशांना अवैध प्रवासी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे़ आयटीआयमध्ये जवळपास ३०० विद्यार्थी आहेत़ त्याचबरोबर विविध कामांनिमित्ताने नागरिक तहसीलला येत असतात़ परंतु, बस थांबत नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे़ (वार्ताहर)
़़़तर चालक-वाहकावर कारवाई
एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना या समस्या सांगितल्या की, कोणत्या क्रमांकाची बस थांबली नाही़ त्याची तक्रार करा, आम्ही कार्यवाही करू अशी ठराविक उत्तरे मिळतात़ प्रवाशांनी लेखी तक्रारी केल्या, मात्र त्यावर कठोर कार्यवाही होत नसल्याचे सांगण्यात येते़
प्रवाशांच्या या समस्येसंदर्भात लातूरचे आगारप्रमुख युवराज थडकर म्हणाले, एसटीच्या वाहक- चालकांना योग्य त्या सूचना करण्यात येतील़ जर पुन्हा तसाच कसूर केल्यास कार्यवाही करण्यात येईल़