रिक्त पदांमुळे कृषी विभाग वाऱ्यावर
By Admin | Updated: June 21, 2015 00:22 IST2015-06-21T00:22:35+5:302015-06-21T00:22:35+5:30
उदगीर : येथील पंचायत समितीला सध्या रिक्त पदांच्या पोकळीने चांगलेच ग्रासले आहे़ कृषी, शिक्षण, बांधकाम, महिला बालकल्याण विभागातील प्रमुख पदेच मोकळी

रिक्त पदांमुळे कृषी विभाग वाऱ्यावर
उदगीर : येथील पंचायत समितीला सध्या रिक्त पदांच्या पोकळीने चांगलेच ग्रासले आहे़ कृषी, शिक्षण, बांधकाम, महिला बालकल्याण विभागातील प्रमुख पदेच मोकळी असल्याने नागरिकांच्या दैैनंदिन कामकाजात अडचणी येऊ लागल्या आहेत़ तसेच कर्मचाऱ्यांवर अंकुश बसविणेही अवघड बनत चालले आहे़ दरम्यान, कृषी विभागातील मुख्य पदे भरली गेली नसल्याने ऐन हंगामात शेतकऱ्यांची अडचण होत आहे़
उदगीरच्या पंचायत समितीची जिल्ह्यातील एक मोठी पंचायत समिती म्हणून गणना होते़ या पंचायत समितीचा तालुक्यातील ९८ गावांशी संपर्क असतो़ त्यामुळे उदगीरच्या कार्यालयात नागरिकांची कोणत्या न् कोणत्या कामासाठी नियमित वर्दळ असते़ परंतु, येथील पंचायत समितीला सध्या रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे़
सध्या पंचायत समितीच्या कृषी विभागात शेतकऱ्यांची कामानिमित्त वर्दळ सुरु आहे़ परंतु, येथील कृषी विभागात प्रमुख जबाबदार पदेच रिक्त असल्यामुळे शेतकऱ्यांची कामे अडून पडत आहेत़ पंचायत समितीच्या कृषी विभागात २ कृषी अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत़ मात्र आजघडीला एक पद अजूनही रिक्त आहे़ तसेच मंजूर असलेल्या ३ कृषी विस्तार अधिकाऱ्यांची सर्वच पदे रिक्त असल्यामुळे अडचणींमध्ये भर पडली आहे़ सध्या पेरणीचे दिवस सुरु आहेत़ कृषी विभागाकडे या हंगामातील कृषी साहित्य येवून पडले आहे़ परंतु, त्याच्या वितरणासाठी या विभागाकडे पुरेसी यंत्रणा नाही़ त्यामुळे सध्याच्या कर्मचाऱ्यांची भंबेरी उडत आहेत़ शिवाय, त्यात शेतकऱ्यांचीही अडचण होत आहे़ येथील शिक्षण विभागात एका गटशिक्षणाधिकाऱ्याचे पद गेल्या दोन वर्षांपासून रिक्त आहे़ सध्या शाळा प्रवेशांचे दिवस सुरु आहे़ अशावेळी पदे भरलेली असणे आवश्यक होती़ मात्र हे पद भरण्यात आले नाही़ येथील महिला व बालकल्याण अधिकाऱ्यांचेही एक पद गेल्या दोन वर्षांपासून रिक्त आहे़ या जागेवर अद्याप कोणीचीही नियुक्ती करण्यात आली नाही़ प्रभारीवरच त्यांचे कामकाज सुरु आहे़ पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील महत्वाचे असलेले शाखा अभियंता हे पद आजघडीला मोकळेच आहे़ सोबतच कनिष्ठ अभियंत्याचेही पद रिक्त राहिले आहे़ परिणामी, रस्ते व इतर बांधकामाची कामे वेळेवर होण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत़ पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी महत्वाचे असणारे ग्रामविकास अधिकारी या प्रशासकीय पदाबाबतही अनास्था दर्शविण्यात येत आहे़ तालुक्यातील ४ ग्रामविकास अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत़ एकेका अधिकाऱ्याकडे २-३ ग्रामपंचायती सोपविण्यात आल्या आहेत़ त्यामुळे एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था झाली आहे़ (वार्ताहर)
उदगीर पंचायत समितीची इमारत सुमारे ५५ वर्षांपूर्वी बांधली गेलेली आहे़ सन १९६० मध्ये तयार केली गेलेली ही इमारत आता जीर्ण झाली असून, तात्पुरत्या मलमपट्टीवर काकाज सुरु आहे़ पावसाळ्यात या इमारतीला अनेक ठिकाणाहून गळती लागते़ गळती लागली की तात्पुरत्या स्वरुपात ती थांबवायची, असाच उपक्रम गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे़ एकिकडे जिल्ह्यातील सर्वच तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समितीच्या नवीन इमारती उभ्या ठाकल्या आहेत़ परंतु, जिल्हा परिषदेने केवळ उदगीर अन् अहमदपूरकडेच दुर्लक्ष केल्याचे दिसते आहे़
४यासंदर्भात गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले, रिक्त पदासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु आहे़ त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर कामकाजाला निश्चितच गती मिळेल़ तसेच इमारतीचाही प्रस्ताव पाठविला आहे़