वैतरणेचे पाणी; आज सादरीकरण
By Admin | Updated: March 22, 2016 01:33 IST2016-03-22T01:02:47+5:302016-03-22T01:33:07+5:30
औरंगाबाद : वैतरणेतील पाणी जायकवाडीत कसे आणता येईल, याबाबत मराठवाडा विकास मंडळाचे सदस्य उद्या मंगळवारी

वैतरणेचे पाणी; आज सादरीकरण
औरंगाबाद : वैतरणेतील पाणी जायकवाडीत कसे आणता येईल, याबाबत मराठवाडा विकास मंडळाचे सदस्य उद्या मंगळवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्यासमोर सादरीकरण करणार आहेत. जायकवाडी धरणात पाण्याची उपलब्धता कमी होत असल्यामुळे वैतरणेतील पाणी वळवून जायकवाडीत आणून पाण्याची कमतरता काही प्रमाणात कमी करता येईल. यासाठी या उपाययोजनांचा समावेश त्या सादरीकरणात असणार आहे. राज्यपालांना भेटणाऱ्या शिष्टमंडळात विभागीय आयुक्त डॉ.उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे, गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक सी. ए. बिराजदार तसेच मराठवाडा विकास मंडळाचे सदस्य शंकरराव नागरे आणि इतर सदस्यांचा समावेश असेल. जायकवाडी धरणात गेल्या काही वर्षांपासून पाण्याची उपलब्धता कमी होत असून, त्यामुळे जायकवाडी धरण भरत नाही. एकीकडे समन्यायी पाणी वाटपाचा वाद आणि त्यातून मिळणारा वाटा पाहता जायकवाडीचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्यपालांची भेट घेण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त डॉ. दांगट म्हणाले, राज्यपालांसमोर सादरीकरण करण्यात येणार आहे. त्यातून अपेक्षित असे साध्य होईल, अशी अपेक्षा आहे. जायकवाडीचा प्रश्नही मांडणार जायकवाडीमध्ये २००७ नंतर आजवर फारसा जलसाठा होत नसल्यामुळे त्याचा परिणाम सिंचनावरदेखील होत आहे. गेल्या चार वर्षांत जायकवाडी धरणातून सिंचनासाठी फारसे पाणी उपलब्ध झालेले नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. तसेच जायकवाडीच्या वरील धरणांतून खाली अपेक्षित पाणी दिले जात नाही. त्यामुळे ही बाबदेखील राज्यपालांच्या नजरेस आणून देण्यात येणार असल्याचे नागरे यांनी सांगितले.