तीन मतदारसंघांत व्हीव्हीपॅटचा वापर
By Admin | Updated: September 13, 2014 00:36 IST2014-09-13T00:34:21+5:302014-09-13T00:36:02+5:30
औरंगाबाद : निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीत काही निवडक मतदारसंघांमध्ये व्होटर व्हेरिफायबल पेपर आॅडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) नावाचे यंत्र वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

तीन मतदारसंघांत व्हीव्हीपॅटचा वापर
औरंगाबाद : निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीत काही निवडक मतदारसंघांमध्ये व्होटर व्हेरिफायबल पेपर आॅडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) नावाचे यंत्र वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मतदारांना मतदान नोंदविले गेल्यानंतर लगेचच त्याची प्रिंटआऊटही दिसणार आहे. औरंगाबाद शहरातील मध्य, पूर्व आणि पश्चिम या तीन मतदारसंघांत व्हीव्हीपॅटचा वापर होणार आहे. परिणामी, येथील मतदारांना त्यांचे मतदान बरोबर नोंदविले गेले की नाही हे तपासता येणार आहे.
निवडणूक आयोगातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयात व्हीव्हीपॅटसंदर्भात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या ठिकाणी औरंगाबाद, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतील सुमारे ३५ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आयोगाचे सचिव के.एन. भार यांनी हे प्रशिक्षण दिले.
प्रशिक्षणानंतर जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी त्याची माहिती दिली. यावेळी उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत हदगल, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत, उपजिल्हाधिकारी संभाजी अडकुणे, स्वाती कारले, रिता मेत्रेवार, तहसीलदार विजय राऊत यांची उपस्थिती होती.
विक्रमकुमार यांनी सांगितले की, आयोगातर्फे राज्यात पहिल्यांदाच व्हीव्हीपॅटचा वापर होत आहे. औरंगाबाद, नाशिक, अहमदनगरसह अमरावती, नागपूर जिल्ह्यांतील काही निवडक मतदारसंघांत हा वापर होत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात पूर्व, पश्चिम आणि मध्य या तीन मतदारसंघांतील प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान यंत्रासोबतच हे व्हीव्हीपॅट बसविले जाईल. त्यामुळे मतदाराने मतदान यंत्रावरील बटन दाबल्यावर लगेच त्याला त्याची प्रिंटआऊट दिसेल. मात्र, ती त्याला मिळणार नाही. हे व्हीव्हीपॅट आणि मतदान यंत्र शेजारीशेजारी एकाच कंपार्टमेंटमध्ये असेल. त्यामुळे मतदानाची प्रिंट मतदाराव्यतिरिक्त दुसऱ्या कुणालाही दिसू शकणार नाही.
प्रिंटआऊट दिसणार असल्यामुळे मतदाराला आपले मतदान बरोबर झाले की नाही, याची खातरजमा करता येणार आहे.
खोडसाळपणा करणाऱ्याविरुद्ध फौजदारी
यंत्रावरील बटन दाबल्यानंतर बरोबर त्याच व्यक्तीला मतदान झाले की नाही हे मतदाराला लगेचच कळू शकणार आहे. चुकीचे मतदान नोंदविले गेल्याचे आढळून आले, तर मतदाराला त्याच ठिकाणी आक्षेप नोंदविता येणार आहे. मात्र, खोडसाळपणे आक्षेप नोंदविल्यास त्याविरुद्ध कारवाई होणार आहे.