हेल्मेटचा वापर वाढतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2016 00:15 IST2016-01-14T23:51:19+5:302016-01-15T00:15:10+5:30
औरंगाबाद : विना हेल्मेट दुचाकी चालविताना अपघात झाल्यास गंभीर दुखापत होऊन मृत्यूचा धोका अधिक असतो.

हेल्मेटचा वापर वाढतोय
औरंगाबाद : विना हेल्मेट दुचाकी चालविताना अपघात झाल्यास गंभीर दुखापत होऊन मृत्यूचा धोका अधिक असतो. ही बाब लोकमतने सुरू केलेल्या ‘दोस्ती हेल्मेटशी दोस्ती’ या वृत्तमालिकेतून नियमाने वाचकांपर्र्यंत पोहोचविण्यात येत आहे. हेल्मेटसंदर्भात आलेले बरे-वाईट अनुभवही सामान्य नागरिक लोकमतच्या माध्यमातून वाचकांना सांगत आहेत. शिवाय वाहतूक पोलिसांकडूनही हेल्मेटसंदर्भात जनजागरण करण्यात येत असल्याने त्याचा चांगला परिणाम दिसण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील दुचाकीचालकांकडून हेल्मेटचा वापर वाढल्याचे दिसत आहे.
विना हेल्मेट दुचाकी चालविताना अपघात घडल्यास मेंदूला गंभीर मार लागून गतवर्षी सुमारे १०२ जणांना प्राणास मुकावे लागले. तसेच त्याहून किती तरी पट लोकांना कित्येक दिवस रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. अशा प्रकारच्या घटनांमध्ये मरण पावलेल्या अथवा जखमी झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यालाही गंभीर परिणाम भोगावे लागतात. दुचाकी अपघातामधील मृत्यू टाळण्यासाठी हेल्मेट हा एक उत्तम उपाय आहे. ही बाब लक्षात घेऊन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी हेल्मेट वापरण्यासंदर्भात जनजागरण सुरू केले आहे. लोकमतने ‘दोस्ती हेल्मेटशी दोस्ती’ ही वृत्त मालिका सुरू केली. या वृत्त मालिकेच्या माध्यमातून हेल्मेटचे महत्त्व सामान्य वाचकांपर्यंत पोहोचत आहे. त्याची गंभीर दखल दुचाकीचालक वाचक घेत आहेत. त्यांच्याकडून आता हेल्मेटचा वापर वाढल्याचे दिसत आहे. महिनाभरापूर्वी रस्त्यावर अपवादाने दिसणाऱ्या हेल्मेटधारी दुचाकीस्वारांची संख्या आता झपाट्याने वाढत असल्याचे दिसते.
पोलिसांची हेल्मेट रॅली पाहिली अन्..
मी आजपर्यंत दुचाकी चालविताना कधीच हेल्मेट वापरलेले नाही; परंतु वाहतूक सुरक्षा पंधरवडा असल्याने ५ जानेवारी रोजी पोलिसांनी काढलेली हेल्मेट दुचाकी रॅली पाहिली आणि मनातल्या मनात स्वत:बद्दलच लाज वाटायला लागली. हेल्मेट वापरण्यासंदर्भात पोलिसांकडून किती मूलभूत बाब सांगितली जात आहे! आपण एवढे दिवस ही बाब समजू शकलो नाही. मात्र, पोलिसांची हेल्मेट रॅली पाहिल्यापासून हेल्मेटशिवाय दुचाकीवर बसायचे नाही, हा संकल्प केला आणि हेल्मेट घालूनच दुचाकी प्रवास सुरू केला. हेल्मेटने केवळ तुमच्याच डोक्याचेच नव्हे तर तुमच्या आयुष्याचे रक्षण होते. त्यामुळे हेल्मेटचे केवळ फायदेच आहेत... -ऋतिक मैड,
विद्यार्थी विवेकानंद महाविद्यालय
तुमचे अनुभव पाठवा...
हेल्मेट ही त्रासदायक वस्तू नसून, त्याच्या वापरामुळे जिवावर बेतलेले संकट टळल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. दुचाकी अपघातात हेल्मेटमुळे तुमचे अथवा कुटुंबातील सदस्याचे प्राण वाचले असल्यास आम्हाला तुमचे अनुभव कळवावेत. आपले अनुभव लोकमत कार्यालयात लेखी स्वरूपात आणून द्यावेत अथवा व्हॉटस् अॅप क्र मांक 9765353544 किंवा 9172515115 या क्रमांकावर पाठवावेत.