जिल्ह्यात युरियाचे ‘शॉर्टेज’ !
By Admin | Updated: November 4, 2014 01:37 IST2014-11-04T00:52:48+5:302014-11-04T01:37:26+5:30
उस्मानाबाद : एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अत्यल्प पावसावर शेतकऱ्यांनी धाडस करुन पेरणी केली.

जिल्ह्यात युरियाचे ‘शॉर्टेज’ !
उस्मानाबाद : एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अत्यल्प पावसावर शेतकऱ्यांनी धाडस करुन पेरणी केली. ही पिके वाढीला लागली आहेत. ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे असे शेतकरी युरिया खरेदी करण्यासाठी दुकानात गर्दी करीत आहेत. मात्र दुकानदारांकडून नकारघंटा ऐकायला मिळत आहे. जिल्हाभरात युरियाचे शॉर्टेज निर्माण झाले असताना कृषी विभाग मात्र झोपेत आहे. त्यामुळे शेतकरी अधिकच संकटात सापडला आहे.
रबी हंगामासाठी कृषी विभागाकडून ८२ हजार ८०० मे टन इतक्या खताची मागणी करण्यात आली होती. मात्र आजवर ६ हजार ५६६ मे टन खत उपलब्ध झाले आहे. अत्यल्प पावसामुळे अनेक तालुक्यात सध्या पेरणीलाही सुरुवात झाली नाही. तर काही भागामध्ये बऱ्यापैकी पेरणी झाली आहे. या परिस्थितीमुळे डीएपी, एमओपी, एनपीके अशा खतांना फारशी मागणी नाही. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे असे शेतकरी पाणी देवून पिके जोपासत आहेत. पिकांची वाढ चांगल्याप्रकारे व्हावी, यासाठी युरियाची गरज असते. मात्र जिल्ह्यात युरियाच उपलब्ध नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. आजवर अवघा ९६२ मे. टन एवढाच युरिया उपलब्ध झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. एकीकडे निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी जेरीस आला असताना दुसरीकडे कृषी विभागाचे दूर्लक्षित धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर उठत आहे.
शेतकऱ्यांच्या तक्रारी येवू लागल्यानंतर प्रस्तूत प्रतिनिधीने कृषी विभागात जावून जबाबदार अधिकाऱ्यांशी विचारणा केली असता, संबंधित अधिकाऱ्यांनाही नेमकं जिल्ह्यात चालले काय? याची खबरबात नव्हती. जिल्ह्यात किती मे. टन युरिया आला आहे याचीही साधी माहिती मोहीम अधिकाऱ्याकडे नव्हती. शेतकरी युरियासाठी दुकानदाराचे उंबरठे झिजवत असतानाही कृषी विभागाला याचे काहीच सोयरसुतक नाही हेच या प्रकारातून दिसून येत आहे. जिल्हा परिषद कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या या दुर्लक्षित धोरणांबाबत शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)