युरियाचे झाले पाणी पाणी
By Admin | Updated: July 11, 2016 01:20 IST2016-07-11T01:10:06+5:302016-07-11T01:20:37+5:30
औरंगाबाद : शहरात रविवारी सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसाचा आनंद घेण्यात एकीकडे शहरवासीय मग्न होते. मात्र त्याच वेळी दुसरीकडे रेल्वे स्टेशनवरील मालधक्क्यावर हमालांची धावपळ सुरू होती.

युरियाचे झाले पाणी पाणी
औरंगाबाद : शहरात रविवारी सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसाचा आनंद घेण्यात एकीकडे शहरवासीय मग्न होते. मात्र त्याच वेळी दुसरीकडे रेल्वे स्टेशनवरील मालधक्क्यावर हमालांची धावपळ सुरू होती. रेल्वेने आलेली युरियाची हजारो पोती भर पावसात उतरविण्यात आली. त्यामुळे ती भिजण्यापासून वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. तरीही शेकडो पोती भिजली. अनेक पोत्यांमधील युरियाचे पाणी पाणी झाले.
विशाखापट्टणम येथून दोन मालगाडीतून प्रत्येकी १३०० टन खत मालधक्क्यावर पोहोचले होते. आलेला माल थेट ट्रकमध्ये भरणे अपेक्षित आहे. मालगाडी थांबून राहिली तर अतिरिक्त भाडे भरण्याची वेळ येते. ही जबाबदारी माल वाहतूकदार अथवा हुंडेकरी यांची असते. पावसामुळे होणारे नुकसान लक्षात घेऊन मालधक्क्यावर शेड उभारण्यात आले आहे. परंतु शेडमधील जागा अपुरी पडत असल्याने आलेला माल उघड्यावर उतरविण्यावर भर दिला जातो. अशाच प्रकारे रविवारीदेखील खताची शेकडो पोती मालधक्क्याच्या दोन्ही बाजूंनी उघड्यावर उतरविण्यात आली होती. पावसाला सुरुवात झाल्यानंतर काही पोत्यांवर प्लास्टिकची ताडपत्री झाकण्यात आली; परंतु अनेक पोती झाकण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे युरियाची शेकडो पोती पावसात भिजली. हमालांनी बरीच पोती ट्रकमध्ये ठेवली. तरीही शेकडो पोती पावसात तासन्तास भिजत राहिली. ही पोती अशीच शेतकऱ्यांपर्यंत जाईल. त्यामुळे तिची गुणवत्ता किती कायम राहील, असा प्रश्न निर्माण होत आहे. खताची पोती ताडपत्रीने झाकण्यात आली होती. शिवाय पोती थेट ट्रकमध्ये लोड करण्यात आली. मालगाडी रिकामी केल्यानंतर संपूर्ण जबाबदारी ही माल उतरविणाऱ्यांची असते, असे मालधक्का व्यवस्थापक शैलेशकुमार म्हणाले.