छत्रपती संभाजीनगर : जाती-जातीत, धर्मा-धर्मांत वाद लावून राष्ट्रवादापेक्षा स्वहिताच्या राजकीय विचारधारेचा प्रवास हा शहरी नक्षलवादच आहे. भविष्यात या नक्षलवादाला राेखणे हे आव्हान आपल्यासमोर असेल, असे मत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी बुधवारी व्यक्त केले. तापडिया नाट्यमंदिरात मराठवाडा युवक विकास मंडळ आयोजित स्व. प्रल्हाद अभ्यंकर व्याख्यानमालेत समारोपप्रसंगी ते ‘राष्ट्रवादी विचारधारेचा राजकीय प्रवास’ या विषयावर बोलत हाेते. विचार मंचावर उद्योजक राहुल पगारिया, अरविंद केंद्रे यांची उपस्थिती होती.
मंत्री शेलार म्हणाले, शहरी नक्षलवाद सुरू झाला आहे. मतांचे राजकारण करून जाती-जातीमध्ये भांडणे लावली जात आहेत. यासाठी विविध माध्यमांतून व्यवस्थेवर प्रश्न निर्माण केले जात आहेत. हिंदुत्व व हिंदू वेगळे आहेत, अशा विचारधारेचे प्रश्न शहरी नक्षलीवादामुळे समोर येत आहेत. जाणता राजा म्हणवून घेणारे नेते टिळक-फुले पगडीवर बोलतात. रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कसे होतील, असे वाद पुढे आणले जातात. जाती-जातींमध्ये तेढ हा शहरी नक्षलवादाचा सर्वात मोठा धोका आहे. जातीचा अधिकार मिळावा; परंतु तो व्यवस्थेतून मिळाला पाहिजे. गांधीवाद सोडून परिवार कायम सत्तेत राहण्यासाठी काँग्रेसने सत्ता मिळविली. हे वर्ष संघ कार्याचे १००वे वर्ष असून, राष्ट्रवादी विचारधारेवर संघाचे कार्य आहे. यावेळी शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, अनिल मकरिये, दयाराम बसैये, उद्योजक विवेक देशपांडे, लता दलाल, माधुरी अदवंत आदींची उपस्थिती होती.
ठाकरे गट, मनसेवर टीका..प्रतिक्रियावादी राजकारणावरून ठाकरे गट व मनसेवरही टीका करीत शेलार म्हणाले, हा नेता असा बोलला की, त्यावर यांची प्रतिक्रिया लगेच असते किंवा त्यांच्या नेत्यांची भाषणे पाहा, राष्ट्रवादी विचारधारेचा कुठेही लवलेश नसतो.